Ramtek Lok Sabha Constituency : रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांची पुन्हा हायकोर्टात (High Court) धाव घेतली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची नोटीस आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आदेशाला रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेत आव्हान दिले आहे. ''केवळ राजकीय आकसापोटी विविध बाजूने कारवाई केली जात असल्याचा" आरोप याचिकेत बर्वे यांच्याकडून करण्यात आला आहे. एकीकडे पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून, दुसरीकडे रश्मी बर्वे यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे शक्तिप्रदर्शन करत आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे देखील रश्मी बर्वे म्हणाल्या आहेत. 


रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्राचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशात सुनील साळवे यांच्या तक्रारीवरून नियमानुसार कारवाई करा व त्याचा अहवाल द्या असा आदेश सामाजिक न्याय विभागाने पडताळणी समितीला दिला आहे. त्यामुळे बर्वे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. केवळ राजकीय आकसापोटी विविध बाजूने कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रश्मी बर्वे यांच्या विरोधातील दोन वादग्रस्त आदेश माहिती राज्य माहिती आयोगाने बॅकफूटवर जाऊन मागे घेतले होते.


रश्मी बर्वे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार... 


जात वैद्यता प्रमाणपत्राला घेऊन सध्या विवादात असलेल्या रामटेक लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे या आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यांच्या विरोधात नुकताच आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेलेले राजू पारवे मैदानात आहे. जात वैद्यता प्रमाणपत्रावर कितीही विवाद केला तरी माझा न्यायालयावर विश्वास असल्याचे रश्मी बर्वे यांनी सांगितले आहे. जिल्हा महायुतीला उमेदवारच मिळाला नसल्याने पक्ष फोडून उमेदवार उभा करावा लागला असा आरोप रश्मी बर्वे यांनी केला. आज आम्ही शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बर्वे यांनी सांगितले आहे. 


काँग्रेस नेतेही म्हणतात रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद होऊ शकतो...


रश्मी बर्वे यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असली तरीही पक्षातील इतर नेतेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहे. काँग्रेस नेते किशोर गजभिये यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच आपण अनेक दशकं सनदी अधिकारी राहिल्यामुळे आणि जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यामुळे मला वाटतंय की, रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो. माझ्या अनुभवाच्या आधारे मी सांगत असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या छाननीत रश्मी बर्वे यांचा अर्ज टिकणार नाही, असे गजभिये म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी ! काँग्रेसमध्ये पहिली विकेट पडली, रामटेकमध्ये बंडखोरीची शक्यता; नाराज गजभिये उद्याच उमेदवारी अर्ज भरणार