रायगड: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले (bharat gogawale) यांना लगावली होती. तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना जशास तसे उत्तर दिले आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतोआणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेट खेळाचे (Cricekt) उदाहरणे आम्हाला देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असे महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना सुनावले.
आज पंचांनी निर्णय जरी दिला असला तरी क्रिकेट पुढे गेलेला आहे आणि यामध्ये थर्ड अंपायर आलेला आहे.मात्र थर्ड अंपायरने हा पालकमंत्री पदाचा निर्णय चुकीचा होता म्हणून आपण पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देऊ शकलो. कर्णधाराने सर्व सहकाऱ्यांना सामावून घेतले पाहिजे.आम्ही तुम्हाला मदत केली म्हणूनच तुम्ही कप्तान होऊन खासदार झालात आणि केंद्रात गेलात, अशी टीकाही थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केली.
राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. परंतु पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील, असे थोरवे यांनी म्हटले. 'छावा' चित्रपटातील औरंगजेबाचा दाखल देत सुनील तटकरे यांना थोरवे यांनी औरंगजेबाची उपमा दिली. 'आमचा औरंगजेब हा सुतार वाडीत बसलाय', अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या टीकेला सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देणार, हे बघावे लागेल.
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावले काय म्हणाले?
रायगडचे पालकमंत्री पद वरिष्ठांच्या विचाराधीन आहे. आमचे तिन्ही नेते याबाबत विचार करत आहेत. हा प्रश्न लवकरच सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्याकडून आदेश झाला की हा तिढा सुटेल. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे भरत गोगावले यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 जानेवारीपूर्वी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती केली होती. यामध्ये रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाच्या नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. या निर्णयावर नाराज होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावी निघून गेले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियु्क्तीला स्थगिती दिली होती. तेव्हापासून नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रीपद अद्याप रिक्त आहे. मध्यंतरी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीलाही शिंदे गटाच्या आमदारांना आमंत्रण न मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अर्थमंत्री अजित पवार आणि अदिती तटकरेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती.
आणखी वाचा
एकच शेठ भरतशेठ! रायगडचा पालकमंत्री मीच होणार, गोगावलेंना विश्वास, अंतिम निर्णयाची सांगितली तारीख