Ajit Pawar & Jayant Patil : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) दाखल होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात बंद दरवाजाआड भेट झाली. दोघांमध्ये तब्बल 30 मिनिटे चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.  जयंत पाटील हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? असा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहेत. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय.


नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?


संजय शिरसाट म्हणाले की, मी अनेक वेळा सांगितलं जयंत पाटील तिथे अस्वस्थ आहेत, त्यांना करमत नाही. यापूर्वीच ते अजित दादा यांच्याबरोबर येणार होते. पण, काय झालं हे माहीत नाही. त्यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चा देखील होऊ शकते. मला त्याबाबत कल्पना नाही. मात्र, भविष्यात जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


संजय राऊत जे बोलतात, त्याच्या नेमकं उलट घडतं


अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचे उत्तम चाललेले असते. शिवसेनेतून आमचे जे काही लोक सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही, असे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, ज्यांनी गद्दारी केली ते असे बोलतात का? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी करून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर बसणारे निष्ठेच्या गोष्टी शिकवतात. यामुळेच यांनी सगळा पक्ष संपवला. संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमकं उलट घडतं हा आतापर्यंतचा इतिहास आहे.म्हणून यापुढे उबाठा आणि राष्ट्रवादीत स्फोट होईल, असे त्यांनी म्हटले. 


मविआकडून घडवून आणलेली दंगल 


नागपूरमध्ये जी दंगल झाली आहे त्यामागे कोण आहे? याचा आम्ही विचार करत आहोत. याच सरकारमध्ये असे काही घटक आहेत का? ज्यांना मुख्यमंत्री हे गृहमंत्री म्हणून अपयशी आहेत असे दाखवायचे आहे का? या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे? याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करायला पाहिजे, असे वक्तव्य ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, फडणवीसंना खाली दाखवण्यासाठी दंगल केली असेल तर यात हात कोणाचा आहे हे देखील सांगायला हवं होतं. महाविकास आघाडीने जाणूनबुजून घडवून आणलेली ही दंगल आहे. मात्र, आमचं सरकार यातील एकही आरोपी सोडणार नाही हे निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले.


आणखी वाचा 


Sanjay Raut : अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...