Gulabrao Patil जळगाव : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू झाल्यापासून माणसांची हवा आता कमी झाली आहे आणि महिलांची हवा वाढलीय. 50 टक्के महिलांनी जरी मतदान केलं तर आपला कार्यक्रम झालाच, ही विरोधकांना भीती आहे. तसेच महिलाही हुशार आहेत, माणसांनी सांगितलं तर हो म्हणतील, पण जो भाऊ पंधराशे देतो, त्याचंच बटन दाबतील, असा मिश्किल टोला शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लागवला आहे.
घरात माणसांनी सांगितलं तरी, जो भाऊ पंधराशे देतो त्याचेच महिला बटन दाबतील, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून काँग्रेस (Congress) कोर्टात गेली, मात्र मुळात माणसांची हवा आता कमी झाली असून महिलांची हवा वाढल्याचेही ते म्हणाले, जर 50% जरी महिलांनी मतदान केलं तरी आपला कार्यक्रम झाला ही विरोधकांना भीती आहे. म्हणून ते खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचेही ते म्हणाले. जळगावमध्ये आयोजित भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केल आहे.
2 कोटी 30 लाख महिलांना योजनेचा लाभ
सध्या लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने जुंपल्याचं दिसून येतय. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्यानंतर, आता एकनाथ शिंदे यांनीही पलटवार केला आहे. राज्यात अनेक योजना यशस्वी राबवण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. या योजनेत कुणी खोडा घातला तर येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणी तुम्हाला खोडा घातल्या शिवाय राहणार नाहीत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रागयडमध्ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना दिले. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या.
राज्यात आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले आहेत. जवळपास 17000 कोटी रुपयांचे वितरण सरकारनं लाडक्या बहिणींना केलं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमची देण्याची वृत्ती आहे. ही योजना बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार अॅडव्हान्समध्ये देणारं सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेमुळं विरोधकांची तोंड काळी झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या