मुंबई : 19 जून रोजी शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन (Shiv Sena Foundation Day) आहे. 58 वर्षे झालेल्या या शिवसेना पक्षात शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे.


शिंदेंच्या शिवसेनेचं वरळीत शक्तीप्रदर्शन


शिंदे यांची शिवसेना वरळी डोम येथे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे. वरळी डोम येथे मोठे शक्तीप्रदर्शन वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेकडून केलं जाईल. सायंकाळी पाच वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. 


ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा


ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे. ठाकरे कुटुंबियांसोबत  ठाकरेंचे सर्व आमदार खासदार जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. त्यामुळे इथे सुद्धा एक मोठं शक्तीप्रदर्शन होईल.


शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागांपैकी 7 जागांवर विजय


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली गेली, ज्यात 15 जागांवर उमेदवार देण्यात आले होते. त्यापैकी सात जागा एकनाथ शिंदे यांनी निवडून आणल्या आहेत. जरी अपेक्षेप्रमाणे हा निकाल नसला तरी. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षांपेक्षा एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक मानला जातोय. त्यामुळेच वर्धापन दिना दिवशीच विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येईल आणि भाषणातून पुन्हा एकदा काँग्रेस सोबतच उद्धव ठाकरे यांच्यावर देखील एकनाथ शिंदे जोरदार बरसतील, अशी शक्यता सांगितली जात आहे. 


लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाला यश


लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि त्यात शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले नऊ खासदार. यामुळे नक्कीच  ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाचा औचित्य साधून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? शिवसैनिकांना नेमका काय सूचना आणि मार्गदर्शन करणार ? याकडे शिवसैनिकांसोबत सर्वांचेच लक्ष असेल.


58 वर्षांत शिवसेनेनं कोणती वादळं झेलली


मागील वर्षी गोरेगाव येथील नेस्को सेंटर मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडला होता, मात्र त्या ठिकाणी काही प्रमाणात गैरसोय झाल्याने यावर्षी वरळी येथे 20000 क्षमता असलेल्या एन एस सी आय डोम मध्ये हा वर्धापन दिनाचा सोहळा पार पडेल, या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सदस्य नोंदणी कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ वर्धापनदिनी करण्यात येईल,


स्थापना दिवसाचा औचित्य साधून उद्यापासून शिवसेना ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्य नोंदणीच्या मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. 2024 ते 2026 असा या सदस्य नोंदणीचा कालावधी असेल.


वर्धापन दिनी लोकसभेत अपेक्षेप्रमाणे जागा आलेल्या नसल्या तरी जे सात खासदार निवडून आले आहेत त्यांचा भव्य दिव्य सत्कार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,  त्यासोबतच एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते आपल्या भाषणातून लोकसभेत कोणत्या चुका झाल्या आणि विधानसभेत त्या चुका कशा टाळायला हव्या हे सांगण्याची शक्यता आहे, एक प्रकारे वर्धापनदिनी विधानसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. 


याच वर्धापन दिनाच्या दिवशी नुकत्याच लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या खासदारांचा  उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. त्यामुळे एक प्रकारे हा वर्धापन दिन आपल्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साह करण्यासाठी आणि एक प्रकारे ऊर्जा भरण्यासाठी  ठाकरेंसाठी महत्त्वाचा असेल.