अहमदनगर : लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आज प्रथमच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)निलेश लंके (Nilesh Lanke) यांची भेट झाली. नगर दक्षिणच्या लोकसभेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाळासाहेब थोरात यांची भेट झाल्यानंतर निलेश लंके यांनी भाषणातून निवडणुकीतील अनेक किस्से उपस्थितांसमोर मांडले. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लंके यांनी आजपर्यंत फेटा घातला नव्हता. आधी बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर फेटा त्यानंतर माझ्या डोक्यावर अशीच भूमिका निलेश लंके यांची होती. त्यामुळे, निलेश लंकेंनी बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर फेटा बांधून स्वत:च्या डोक्यावर फेटा बांधला. 


माझ्या निवडणुकीत कृष्णाची भूमिका ज्यांनी बजावली त्यांना आधी फेटा बांधा, नंतर मला, अशीच भूमिका लंके यांच्या सत्कार सोहळ्यात खासदार लंके यांनी घेतली. यावेळी पहिला फेटा थोरात यांना आणि दुसरा फेटा लंके यांना बांधण्यात आला. बाळासाहेब थोरात यांच्याकडून निलेश लंकेंचा खासदार झाल्याबद्दल संगमनेरवासियांच्यावतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रच्या राजकारणात विखे व थोरात यांच्यातील संघर्ष अनेकदा समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखेंचा पराभव केल्यानंतर आज प्रथमच निलेश लंके आणि बाळासाहेब थोरात यांची भेट झाली. संगमनेर शहरात झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी विखे यांचे कट्टर राजकीय विरोधक आवर्जून उपस्थित होते. निलेश लंके यांना फेटा बांधण्यासाठी आग्रह केल्यानंतर पहिला फेटा बाळासाहेब थोरात यांना बांधा, त्यानंतरच मी बांधेल असं वक्तव्य निलेश लंके यांनी केलं. विजय झाल्यापासून मी फेटा बांधला नाही जर बांधला असेल तर माझं नाव बदलून टाकेल, असं सांगत पहिला फेटा बाळासाहेब थोरात यांना या सत्कार सोहळ्याप्रसंगी फेटा बांधल्यानंतर निलेश लंके यांनी सत्काराचा स्वीकार केला.


किंग होणं सोप्प, पण किंगमेकर होणं अवघड


मी विजयी झालो मात्र विजयाचा आनंद आज मिळाला. विजयानंतर मी आजपर्यंत कोणालाही फेटा बांधू दिला नाही. मी सुध्दा यांच्यापेक्षा (थोरात)दहा पट हट्टी आहे. कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांचा विजय श्रीकृष्णामुळे झाला. माझ्या निवडणुकीत श्रीकृष्णाची भूमिका पार पाडली ते एकमेव बाळासाहेब थोरात. माझ्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा काम करत होती. त्यांनी काय काय काम केलं, हे मला निकालानंतर सगळं समजलं. मी विजयी झालो त्यावेळेस बाळासाहेब थोरात आजारी होते. त्यांना खूप आग्रह केला मात्र ते येऊ शकले नाहीत. गाडीत सलाईन घ्या.. इंजेक्शन मारा..मात्र या.. असा माझा आग्रह होता. म्हणूनच, ज्या माणसाने मला दिल्ली दाखवली त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज संगमनेर मध्ये आलोय. किंग होणं सोप्प मात्र किंगमेकर होणं अवघड, अशा शब्दात आपल्या विजयाचे किंगमेकर बाळासाहेब थोरात असल्याचे लंके यांनी म्हटलं. 


मी थोरातांना सॅल्यूट करतो


माझ्या विजयात किंगमकरची भूमिका बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केली. उमेदवारावर विश्वास नसतानाही थोरात यांनी त्यांची यंत्रणा राबवून हा विजय संपादन केला. माझ्या निवडणुकीचा रिमोट बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता. विरोधकांकडे सीसीटीव्ही कॅमेरा होता. मात्र माझ्याकडे ड्रोन कॅमेरा होता. मला वाटायचं मी हुशार, मात्र थोरात साहेबांची यंत्रणा पाहिल्यावर मला माझी लायकी समजली. माझ्या निवडणुकीचा खरा निकाल थोरात यंत्रणेमुळे मला मिळत होता. मी थोरात यांना धन्यवाद नव्हे तर सॅल्यूट करतो. कारण, विरोधकांची निम्मी यंत्रणा माझ्याबरोबरच होती. मी आता प्रोफेशनल होणार आहे.


मी प्रोफेशनल होणार


कोणाला भेटायचं, कोणाला नाही याचा आधी विचार करेल, असे म्हणत मारणे यांच्या भेटीवरुन अप्रत्यक्षपणे मत मांडंल. तसेच, पवार साहेबांनी सुद्धा यापुढे विचार करून वागण्याचा सल्ला दिला. ठेच लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही. मी शेवटचा श्वास घेईल, त्या दिवशीच थोरात यांना विसरेल. थोरात साहेबांनी आत्तापर्यंत अनेक निवडणुका जिंकल्या मात्र माझ्या विजयाचा आनंद हा त्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे याचा मला विश्वास. मला अजूनही वाटत नाही मी खासदार झालो. मात्र, तुम्ही सत्कार केला, त्यानंतर आता मला खात्री पटली.


सुजय विखेंना टोला


लवकरच दुधाचं मोठा आंदोलन केलं जाईल. एकाही मंत्राला जिल्ह्यात फिरू देणार नाही. माझं लोकसभेतलं पहिला भाषण इंग्रजीतच असेल. सगळ्यांनी टीव्ही चालू करून बसा मग कळेल मी इंग्रजी बोललो की उर्दू बोललो.. असे म्हणत निलेश लंकेंनी सुजय विखेंना टोलाही लगावला.