सोलापूर : काम करायचं नसेल तर बदली घ्या, तुमची शिफारस मी करेन, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे (MP Praniti Shinde) यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. 'मी किंवा वडिलांनी कधी कमिशन किंवा टक्केवारी असले प्रकार केले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी असेच काम करावे, जर तुमचे आणि माझे ध्येय एक असेल, तर आपण सोलापूर जिल्ह्यात मिळून काम करू. नसेल तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात बदली मागून घ्या, मी पहिल्यांदा शिफारस करून देईन.' ही भाषा आहे सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांची. आज पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी, गाडेगाव वगैरे भागात खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्याला सुरुवात केली. खासदार होऊन अजून पंधरा दिवस होण्यापूर्वीच त्यांनी लोकांमध्ये मिसळून आपल्या कामाच्या पद्धतीची झलक दाखवली आहे. 


खासदार प्रणिती शिंदेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम


खासदार प्रणिती शिंदे यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री हे शांत राजकारणी म्हणून देशाला परिचित असताना त्यांच्या मुलीकडून मात्र, तरुणाईला हव्या असणाऱ्या आक्रमक पद्धतीवर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी दौऱ्यात फिरताना सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी गावकऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. ज्या अधिकाऱ्यांकडे कामे आहेत, त्यांना जागेवर सूचना देऊन लोकांची कामे अडता कामा नयेत, असा इशारा दिला आहे. 


काम करायचं नसेल तर बदली घ्या


सध्या राज्यात आणि केंद्रात महाविकास आघाडी विरोधी पक्षात असल्याने अधिकाऱ्यांकडून लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, असे सांगताना माझ्याकडून अधिकाऱ्यांना त्रास होणार नाही. मात्र माझ्या लोकांना तुमच्याकडून त्रास होता कामा नये, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. जर त्यांची अडवणूक होताना दिसल्यास तुमचे माझे जमणार नाही, असंही प्रणिती शिंदेंनी म्हटलं.


मी हक्कभंग आणलं, तर काय होईल लक्षात ठेवा


मी किंवा माझ्या वडिलांनी कधी हक्कभंग कोणावर आणला नाही. पण माझ्या लोकांना त्रास झाल्याचे दिसल्यास मी हक्कभंग आणेन आणि मग काय होते, हे तुम्हाला चांगले माहित आहे. कायमचे घरी बसावे लागेल, असा सज्जड दम देताना लोकांना त्रास न देता काम करा असा सल्लाही दिला. 


खासदार झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांतच लोकांशी संपर्क ठेवण्यास सुरुवात


सोलापूर लोकसभा मतदारसंघात बऱ्याच वर्षानंतर काँग्रेस विजयी झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीपासूनच लोकांशी संपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 10 वर्षात भाजप खासदाराने संपर्क न ठेवल्याने भाजपचा पराभव झाला, याची जाणीव प्रणिती शिंदे यांना असल्याने त्यांनी आतापासूनच मतदारांशी संवाद ठेवण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा विधानसभेला काँग्रेस उमेदवाराला होणार याचे गणित डोक्यात ठेवून प्रणिती शिंदे यांनी पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. यावेळी भाजप विरोधी लाट असल्याने प्रचंड बहुमत पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात प्रणिती शिंदे यांनी मिळवले असून आता विधानसभेला हाच ट्रेंड ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ही भाजपसाठी धोक्याची घंटा असून येथील भाजप आमदार समाधान अवताडे यांना विधानसभेला खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा फटका बसू शकणार आहे.