Sharad Pawar Z Plus Security : नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना वाय दर्जाची सुरक्षा वाढवून झेड प्लस सुरक्षा दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयानंतर खुद्द शरद पवारांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. अशातच आज (शुक्रवारी) शरद पवारांच्या झेड प्लस सुरक्षेप्रकरणी दिल्लीतील घरी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी अंशतः सुरक्षा नाकारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


महाराष्ट्रातील (Maharashtra News) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी झेड प्लस सुरक्षा अंशतः नाकारल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी शरद पवारांनी नाकारल्या आहेत. सुरक्षा दलाची गाडी वापरण्याचा आग्रह पवारांना अमान्य आहे. तसेच, घरात सुरक्षा कडं नसावं, अशी सूचना शरद पवारांनी केल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, झेड प्लस सुरक्षेप्रकरणी शरद पवारांच्या दिल्लीतील घरी बैठक पार पडली. वाय दर्जाची सुरक्षा वाढवून शरद पवारांना नुकतीच झेड प्लस सुरक्षा बहाल करण्यात आली होती. 


शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत काय काय झालं? 


शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी झेड प्लस सुरक्षेबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी सीआरपीएफचे डीजी स्वतः उपस्थित होते. त्यांच्याकडून शरद पवारांना सविस्तर माहिती देण्यात आली. पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय का घेण्यात आला? अशा अनेक गोष्टींबाबत शरद पवारांना थेट माहिती देण्यात आली आहे. 


बैठकीबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या अटी- शर्थीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर होणार आहे. शरद पवारांना सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती थेट शरद पवारांना देण्यात आली, दुसऱ्या कुणालाही याबाबत काहीच सांगण्यात आलेलं नाही. सुरक्षेत वाढ करण्यात आल्याबाबत 15 ऑगस्ट रोजी शरद पवारांना गृह मंत्रालयाकडून पत्र पाठवण्यात आलं होतं. सीआरपीएफचे महासंचालक कमलेश सिंह, गृहमंत्रालयाचे अधिकारी, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन दल, इंटेलिनजन्स ब्युरोचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते. थ्रेट परसेप्शन काय आहे, याबाबतची माहिती फक्त शरद पवारांना देण्यात आली आहे. 


शरद पवारांनी कोणत्या अटी-शर्थी ठेवल्या? 


केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं सुरक्षा वाढवण्याचं कारण मात्र गुप्त ठेवण्यात आलं आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या भिंतीची उंची वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शरद पवारांसोबत 50 सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्ट मध्ये असणार आहेत. त्यासोबतच सुरक्षा दलाकडून दिलेली गाडीच वापरावी, असा आग्रह शरद पवारांना करण्यात आला आहे. परंतु, शरद पवारांना यासाठी स्पष्ट नकार दिल्याची माहिती सुत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच, घराच्या आतमध्ये सुरक्षाकडं नसावं, अशी सूचना शरद पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


दरम्यान, शरद पवारांसह देशातील इतर अजून तीन व्यक्तींना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्याबाबत गृहखात्याच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच, शरद पवारांच्या सुरक्षेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अहवाल सादर झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे. 


केंद्रानं देऊ केलेल्या झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांना संशय 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना नुकतीच केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा देऊ केली आहे. पण, शरद पवारांनी मात्र, केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केला आहे. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं शरद पवार म्हणाले आहेत. 


पाहा व्हिडीओ : Sharad Pawar Security: झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी शरद पवारांनी नाकारल्या