मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी आंदोलनाच्या तयारीत असलेले काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासून धरपकड सुरु केली आहे. मुंबई पोलिसांनी काँग्रेसच्या (Congress) प्रमुख नेत्यांभोवती कडा पहारा ठेवून त्यांना निदर्शनासाठी बाहेर पडण्यासाठी मज्जाव केला आहे. यामुळे खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सकाळपासून वर्षा गायकवाड यांना त्यांच्या घरीच स्थानबद्ध करुन ठेवले आहे. याबद्दल संताप व्यक्त करताना वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, मी फरार आहे का, अतिरेकी आहे का, मी एखाद्या गुन्ह्यात सामील आहे का? तुम्ही मला का पकडून ठेवले आहे? माझ्या घरच्या लोकांना मला भेटू दिले जात नाही, पत्रकारांना भेटून दिले जात नाही. इमारतीमधील कर्मचाऱ्यांना आतमध्ये येऊन दिले जात नाही. मी असा कोणता गुन्हा केलाय की पोलिसांनी मला अडवून ठेवले आहे? फडणवीस साहेब तुम्ही काय वागताय? जिथे शासन केलं पाहिजे, तिकडे तुम्ही शासन करत नाही आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, असे वर्षा गायकवाड यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी मुंबईच्या बीकेसी येथील जिओ सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या उद्योजकांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शहरात काही ठिकाणी 'मोदी माफी मागो', असे बॅनर्स लावले होते. काँग्रेस पक्षाला मोदींना काळे झेंडे दाखवायचे होते. मात्र, पोलिसांनी सकाळपासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. काँग्रेसच्या नसीम खान, भाई जगताप, अस्लम शेख या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वर्षा गायकवाड यांना इमारतीमधून बाहेर सोडले जात नसल्याने त्यांनी इमारतीच्या खालीच धरणे आंदोलन सुरु केले आहे. याठिकाणी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. त्यानंतर पोलिसांच्या दाव्यानुसार, पोलीस आता वर्षा गायकवाड यांना आंदोलनासाठी शिवाजी पार्क येथे सोडणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी वर्षा गायकवाड आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या गाडीतून शिवाजी पार्कला नेले.
वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या जेएनपीटीच्या कामगारांना प्रवेश नाकारला
वाढवण बंदराचे भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित झाले आहेत. मात्र, ज्या नागरिकांनी काळी पॅन्ट किंवा काळा सट घातला असेल त्यांना या कार्यक्रमासाठी प्रवेश नाकारला जात आहे. उरणहून अधिकाऱ्यांच्या निमंत्रणाने मोठ्या प्रमाणात जेएनपीटीचे कर्मचारी या कार्यक्रमासाठी आले आहेत त्यांनाही या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही पूर्व सूचना दिलेली नसून आम्हाला प्रवेश नाकारला ही खेदाची बाब आहे, अशी नाराजी कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
वाढवण बंदराच्या कामाला मच्छीमारांचा विरोध, डहाणूत बोटींवर काळे फुगे लावत समुद्रात निषेध रॅली