मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल (Praful Patel)  यांनी पंतप्रधान नरेंद्र (PM Modi)  मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केल्याने वादाला तोंड फुटले आहे. महराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान असल्याचे सांगत विरोधकांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधानांनी मोदींना जिरेटोप भेट देण्यावरून शरद पवारांनी सडकून टीका केली. लाचारीला देखील मर्यादा असते अशा शब्दांत पवारांनी पटेल यांचा समाचार घेतला आहे.


शरद पवार म्हणाले,  जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ओळखला जातो.  लाचारी असते नाही असं नाही पण लाचारीला काही मर्यादा असते, त्या सगळ्या मर्यादा त्या लोकांनी सोडल्या आहेत. एक चांगले झालं की त्यांनी सांगितले की पुन्हा आम्ही काळजी घेऊ .


 शरद पवारांची प्रफुल पटेलांवर बोचरी टीका


महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही, अशी टीका शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. मात्र  शरद पवारांनी आतापर्यंत कोणतेही भाष्य केले नव्हते. आज पहिल्यांदाच प्रफुल पटेलांच्या या कृतीचा शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 


शिवप्रेमींच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या


वारणसीला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रफुल पटेलांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात जिरेटोप घातल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवप्रेमींच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या. तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली. या सगळ्या वादंगानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी एक पाऊल मागे घेत यापुढे काळजी घेऊ, असा शब्द शिवप्रेमींना दिला आहे.


प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया


"हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ",असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं.  


Video :                



हे ही वाचा :


काल महाराजांचा जिरेटोप, आज गांधी टोपी, रोज टोपी बदलणारा माणूस, तुम्हाला देशाचा पंतप्रधान पाहिजे? उद्धव ठाकरेंचा सवाल