Sharad Pawar vs Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी 1977 मधील घडामोडींचा संदर्भ देताना पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं वक्तव्य केलं होतं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. "1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात," असं शरद पवार म्हणाले. बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सोबतच राष्ट्रवादीमधील बदलांबाबतही भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दात भाष्य
देवेंद्र फडणवीस म्हणतात एकनाथ शिंदेंनी केली तर बेईमानी आणि पवारसाहेबांनी केली तरी मुत्सद्देगिरी? असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले की, "कधी केली पवारांनी? कधी केली हे त्यांनी सांगावं. 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. ते लहान होते त्यावेळी, त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहित नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवलं. त्यावेळी जनसंघाचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर हशू अडवाणी होते आणि काही सदस्य होते. त्यावेळी ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात, यापेक्षा जास्त भाष्य करण्याची गरज नाही."
फडणवीस काय म्हणाले होते?
चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा उल्लेख करत 1977 च्या घडामोडींचा संदर्भ दिला. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लक्ष्य करताना 1977 साली त्यांनी स्थापन केलेल्या सरकारचा संदर्भ दिला. "शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?" असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता.
मॅच्युअर पॉलिटिक्सची कमतरता
बिहारच्या पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीवर भाजपकडून जोरदार टीक करण्यात येत आहे. 19 पंतप्रधान एकत्र आले होते, असा टोला भाजपने लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना अशाप्रकारची भाष्य करणं पोरकटपणा आहे. या संबंध बैठकीत पंतप्रधानपदावर चर्चा देखील झाली नाही. महागाई, बेरोजगारी आणि धार्मिक तेढ या मुद्द्यांवर चर्चा झाली, असं पवारांनी सांगितलं. तसंच लोकशाहीत बैठक घ्यायला परवानगी नाही? असा सवालही शरद पवार यांनी विचारला आहे. पवार म्हणाले की, "गेले दोन दिवस अनेक तथाकथित नेते हे लोक जमले का, त्यांनी बैठक का घेतली, लोकशाहीत बैठक घ्यायला परवानगी नाही? भाजप प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य आलं की बैठकांची गरज का होती. दुसऱ्या दिवशी त्यांचं वक्तव्य आलं की मुंबईत त्यांच्या मित्रपक्षांची बैठक ते घेणार आहेत. तुम्हाला बैठक घेता येतात पण इतरांनी बैठका घेतल्या तर तुम्हाला चिंता का वाटते. माझ्या मते मॅच्युअर पॉलिटिक्स म्हणतात त्याची कमतरता यापेक्षा जास्त काही सांगायची गरज नाही."
'हे फडणवीस यांचं अज्ञान'
राष्ट्रवादीत ओबीसींना फक्त दाखवण्यापुरतं घेतलं जातं, त्यांना कोणत्या पदावर संधी दिली जात नाही, असं देवेंद फडणवीस म्हणाले होते. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, पुन्हा एकदा सांगतो हे फडणवीस यांचं अज्ञान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले महाराष्ट्र अध्यक्ष होते छगन भुजबळ. ते कोण आहेत? त्यानंतर अध्यक्षपदावर पिचड होते, ते कोण आहेत? त्यानंतर सुनील तटकरे. ही सगळी यादी जर दिली अर्थात त्यांचं वाचन किती आहे याची मला माहिती नाही. पण या सगळ्या गोष्टींची नोंद न घेता वक्तव्य करतात. लोकांना माहित असतं. लोकांना हाही अनुभव आहे त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तवाला धरुन नाही.
अजितदादांची जबाबदारी बदलणार का, पवार म्हणतात...
आपल्याला दुसरी जबाबदारी द्यावी असं अजितपवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात म्हटलं होतं. आता अजितदादांची जबाबदारी बदलणार का आणि बदलली तर कोणती जबाबदारी देणार या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, "हा निर्णय एकटा घेत नसतो. त्यांच्यासह प्रमुख लोक बसतील आणि त्यासंबंधी निर्णय घेतील. आज पक्षसंघटनेच्या कामात सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी भावना आहे. तेच मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं त्यापेक्षा जास्त काही नाही."
VIDEO : Sharad Pawar Full PC Baramati : Mature Politics ची कमतरता, शरद पवारांचा भाजपला टोला