पुणे: मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केल्यानंतर मी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी आजपर्यंत मी एकही शब्द बोललेलो नाही. आमची कोणतीही भेट झालेली नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे बोलविते धनी असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फटकारले. जबाबदारीच्या पदावर बसलेली लोकं इतकं पोरकट बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात कधीच पाहिले नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्याशी कोणतेही संबंध असल्याचे आरोप सपशेल फेटाळून लावले. जरांगे आणि माझा संबंध विचारात घेतला तर त्यांचे उपोषण सुरु झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा मी त्यांनी म्हणालो होतो की, तुमच्या मागण्या आणि आग्रह मी समजू शकतो. दोन समाजांमध्ये अंतर वाढेल, असं काही करु नका. महाराष्ट्राचं ऐक्य टिकेल, असे वागा, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी माझे एकाही शब्दाने बोलणे झालेले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
सरकारने राजेश टोपेंची मदत घेतली अन् आता त्यांच्यावरच आरोप लावले: शरद पवार
यावेळी शरद पवार यांनी राजेश टोपे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. राजेश टोपे यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत. मुळात राज्य सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी राजेश टोपे यांची मदत घेत होते. त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करावी, असे काही जबाबदार लोकांनी सुचवले होते. एका बाजूने त्यांची मदत घेतली जाते. मात्र, दुसरीकडे त्यांच्यावर प्रहार केला जात असेल तर उद्या एखादा प्रश्न निर्माण होईल तेव्हा राज्य सरकारवर कोण विश्वास ठेवणार?, असा सवाल शरद पवारांनी विचारला. मनोज जरांगे प्रकरणात जी काही एसआयटी चौकशी करायची आहे, ती करा. आमची काही हरकत नाही. आमचे आणि जरांगे पाटील यांचे फोन तपासा, असे शरद पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
सरकारचा अॅटिट्यूड एका दिवसात बदलला, वार उलटं फिरलं, मनोज जरांगे अडचणीत कसे सापडले?