मुंबई: अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा राज्याचा हंगामी अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) विधिमंडळात सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यामधील उणीवा काढल्या. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अजित पवारांचा अर्थसंकल्प हंगामी नव्हे तर पूर्ण अर्थसंकल्प आणि घोषणांचा पाऊस होता, अशी टिप्पणी केली. उद्धव ठाकरे यांच्या या एका टिप्पणीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीसे डिवचले गेले. या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत एकापाठोपाठ एक असा उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे हा पूर्ण बजेट आणि घोषणांचा पाऊस होता, असे म्हणतात. याचा अर्थ निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट मांडायचाच नाही का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.


मुख्यमंत्र्यांना विचारलेला प्रश्न झेलत अजितदादांनी ठाकरेंना फटकारले


या पत्रकार परिषदेवेळी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिन्ही नेत्यांची एकी दिसून आली. प्रसारमाध्यमांनी खरंतर हा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला होता. पण त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या अर्थमंत्री अजित पवार यांना राहवले नाही. शिंदेंचे बोलणे सुरु असताना अजित पवारांनी मध्येच उडी घेत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, ज्यावेळी आम्ही दोघं त्यांच्या सरकारमध्ये होतो, तेव्हा उद्धव ठाकरे माझं कौतुक करायचे. अर्थसंकल्पाबाबत बोलताना ते म्हणायचे की, 'फार छान आहे, फार छान आहे'. आता मी इकडे आहे म्हणून ते वेगळी भूमिका घेत आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.


देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरेंची पोलखोल


उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेबद्दल पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बजेटचे किती ज्ञान आहे, हे उघड करणारा एक किस्सा सांगितला. उद्धव ठाकरे यांनी एकदा केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर एका कार्यक्रमात प्रांजळपणे सांगितले होते की, मला बजेटमधलं काही कळत नाही. त्यामुळे मी बजेटवर काही बोलू शकत नाही. उद्धव ठाकरे यांचे आजचे वक्तव्य पाहता ते लक्षात येते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


आणखी वाचा


उद्धव ठाकरे तेव्हा म्हणायचे, फार छान आहे, फार छान आहे, मग आता काय झालं? : अजित पवार