जालना : शिवसेना आणि भाजपला आम्हाला एकत्र येऊ द्यायचं नव्हतं, त्यासाठी 2014 च्या निवडणुकीत आम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, पण अजित पवारांना (Ajit Pawar) राजकारणातल्या काही गोष्टी कळाळेल्या नाहीत असा टोला शरद पवारांनी (Sharad Pawar) लगावला. त्यावेळी भाजपला पाठिंबा देण्याची गोष्ट जरूर बोललो असेल, पण तसं काही केलं नाही, आम्ही आमचा रस्ता कधी सोडला नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. जालन्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी ही माहिती दिली. 


बोललो जरूर, पण तसं केलं नाही


अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर शरद पवार म्हणाले की, सन 2014 साली तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची सुरुवात तेव्हापासून झाली असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांना कळलं नाही ते असं आहे, आम्हाला त्यावेळी काहीही झालं तरी सेना आणि भाजप एकत्र येऊ द्यायचं नव्हतं, आणि ते एकत्र येऊ न देण्यासाठी मी जरूर काही गोष्टी बोललो. शेवटी आम्ही तसं केलं का हा प्रश्न महत्त्वाचा आहे.


आम्ही आमचा रस्ता सोडला नाही


शरद पवार म्हणाले की, भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्याळी एका उद्योगपतीच्या घरी भेट झाल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. तेम म्हणाले की, अशा चर्चा होत असतात. शेवटी निर्णय महत्वाचा असतो. निर्णय काय तर मी भाजपबरोबर काही गेलो नाही. उद्या तसं कुणी सुचवलं, तुम्हीही सुचवू शकता. सुचवलं म्हणजे स्वीकारलं असं होत नाही. ही चर्चा अशा वेगवेगळ्या विषयावरही होत असेल. पण अंतिम निर्णय काय हा महत्त्वाचा आहे आणि अंतिम निर्णय मी सांगितला. आम्ही आमचा रस्ता सोडलेला नाही. 


अजित पवारांचा तो दावा खोटा


1989 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी अजित पवारांना उमेदवारी द्या अशी काही नेत्यांनी मागणी केली होती. त्यावेळी अजितला दिल्लीला जाऊ द्या, मी काटेवाडीला जातो शेती करायला असं शरद पवारांनी म्हटल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. तो दावा खोटा असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. 


मला प्रश्न विचारण्यापेक्षा गेल्या दहा वर्षांत मोदींनी काय केलं ते सांगावं


मराठवाड्याचा विकास महाविकास आघाडीच्या काळात रखडला असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षात काय केलं ते सांगावं. जे सत्तेत नाहीत त्यांनी विकास रखडवला असं सांगण्यात काय अर्थ आहे. अमित शहा म्हणतात गेल्या दहा वर्षात शरद पवारांनी काय केलं याचा हिशोब द्यावा.  2014 ते 2024 मध्ये ते सत्तेवर आहेत, मी नाही. मी विरोधात आहे आणि ते हिशोब माझ्याकडून मागतात, त्यांची जबाबदारी ते सांगत नाहीत. 


सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करणारी माणसांची राजकीय उंची फार होती. त्यावेळेस त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा विचार गांभीर्याने घ्यायची. आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांचा 60 ते  70 टक्के अन्य पक्षाच्या नेतृत्वावरती विचारावर हल्ला करणे एवढा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे असं शरद पवार म्हणाले. 


पैशाच्या जोरावर निवडणूक यंत्रणा हाती घेतात


शरद पवार म्हणाले की, माझ्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचा खर्च चार लाख रुपये होता आणि 56 वर्षांपूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हा माझा खर्च 11 ते 12 हजाराच्या आसपास होता. आता सगळे चित्र बदललेलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते कोणत्याही मार्गाने रिसोर्सेस उभा करतात आणि त्या ताकदीवर निवडणूक यंत्रणा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात असं दिसते.


ही बातमी वाचा: