मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत 2019 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीआधी नेमकी काय चर्चा झाली होती यावरून सुरू झालेलं राजकारण काही संपायचं नाव घेत नाही. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray)  मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी दिल्लीत जातो असं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) म्हटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भ्रमिष्ठ झालेत, त्यांना वेड लागलंय असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा केलेला दावा खोडून काढला आहे. 


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?


उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाल की, उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत. त्यांना वेड लागलंय, मला नाही. कालपर्यंत ते वेगळ्याच भ्रमात होते. कालपर्यंत म्हणत होते की अमित शाहांनी त्यांना कुठल्यातरी खोलीत नेऊन मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता.  आता त्यांचा भ्रम बदलला. आता म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्री करतो असा शब्द दिला. उद्धव ठाकरेंनी नेमकं ठरवावं त्यांना नेमकं कोण शब्द दिला होता. 


काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?


आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार होते असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अमित शाह भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपचा सूर बदलला असंही उद्धव म्हणाले. 


तुम्ही देश पाहा, आम्ही महाराष्ट्र पाहतो असं बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हापासून भाजप आणि आमच्यात चांगलं सुरू होतं. 2012 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झाल्यावर मोदी घरी आले होते. 2014 मध्ये मोदी पीएम झाले तेव्हा वाटलं, आपलं स्वप्न पूर्ण झालं. पण अमित शाह अध्यक्ष बनल्यावर भाजपचा सूर बदलला. भाजपच्या बोलण्यात मग्रुरी दिसत होती. बाळासाहेब गेले, वार करण्याची हीच वेळ आहे असं भाजपला वाटलं. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण आहे. माझ्यासोबत त्यांनी हेच करण्याचा प्रयत्न केला


ही बातमी वाचा :