सोलापूर : निवडणुकांच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरा-जोरात सुरू आहेत. त्यामध्ये, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच सर्वच नेतेमंडळी आघाडीवर असल्याचे दिसतात. अगदी सरपंच, आमदारांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वजण राजकीय टोलेबाजी करताना दिसत आहे. पंढरपूर (pandhapur) येथे आज ना. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची जाहीर सभा होती. या सभेनंतर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार हे, असं जहाज आहे जे समुद्राच्या मधोमध गेलंय आणि ते बुडणार आहे, ज्या लोकांना त्यात बसायची हौस झाली आहे ते आता त्यांना घेऊन मधोमध जाऊन बुडणार आहेत. त्यांना वाचवायलाही तिथे कोणही येणार नाही, अशा शब्दात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. हे जरी महाराष्ट्रात हवा आहे असे म्हणत असले तरी ते फक्त 10 जागा लढवत आहेत, उंदीर माजला म्हणून तो काही बैलगाडी ओढत नाही, असाही टोला पडळकरांनी लगावला. 


महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेनंतर गोपीचंद पडळकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष तुम्हाला काही दिवसांनी दिसणार नाही. राष्ट्रवादी स्थापन झाली तेंव्हा ते 36 जागांवर लढले होते , नंतर 26 जागांवर लढले , पुन्हा 22 जागंवर नंतर 16 जागांवर आणि आता केवळ 10 जागा लढवत आहेत. भाजप 1980 साली स्थापन झाली तेंव्हा फक्त 2 खासदार निवडून आले होते . त्यावेळी वाजपेयी आणि अडवाणी देखील पडले होते. त्याच भाजपने गेल्या निवडणुकीत 303 जागा जिंकल्या आणि आता 400 पारचा नारा मोदींनी दिला आहे. त्यांचा उतरता क्रम आणि भाजपचा चढता क्रम पाहा, असे सांगत 2024 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा 100 टक्के अस्त होईल आणि 2029 च्या निवडणुकीत राज्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी पार्टी दिसणार देखील नाही, असे भाकीतच पडळकर यांनी केले आहे. 
      
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करताना सांगली येथे त्यांच्या उमेदवाराचे डिपॉझिट देखील राहणार नाही, असा टोला पडळकर यांनी लगावला. त्या बिचाऱ्याचा बळी गेला आहे, त्याला बूथला माणसे देखील मिळत नसल्याचे सांगत चंद्रहार पाटील यांना टोला लगावला. सध्या महाराष्ट्रातील सगळी परिस्थिती एनडीएच्या आणि महायुतीच्याबाजूने असून तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्याची जनतेची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटलं. 
     
उत्तम जानकरांना टोला


माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजप मोठ्या फरकाने जिंकणार. जुना मित्र उत्तम जानकर यांबाबत बोलताना मी एक भाजपचा साधा कार्यकर्ता आहे, त्यांच्याइतका वरचा नेता मी नाही. मी त्यांच्या माळशिरसपासून मंगळवेढा, सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रचार करीत असून महायुतीला खूप चांगले वातावरण असल्याचा टोला जानकर यांना लगावला.


मोहिते पाटलांवरील टीकेला उत्तर 
     
मोहिते पाटील यांच्याबाबत काही लोकांनी त्यांच्या गुंडगिरीबाबत तक्रारी फडणवीस यांचेकडे केल्या होत्या. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री म्हणून लोकांना गुंडगिरीच्या विरोधात संरक्षण देणे ही त्यांची जबाबदारी असल्याने फडणवीस यांनी हा इशारा दिल्याचे पडळकर यांनी म्हटले. मात्र, मोहिते पाटील भाजपमध्ये असताना राम होते आणि बाहेर पडल्यावर दहशतवादी झाले असा सवाल धैर्यशील मोहिते पाटील यांनी केल्याचे निदर्शनास आणताच अशा पद्धतीच्या तक्रारी ते भाजपमध्ये असतानाही झाल्या असत्या तरी फडणवीस यांनी हीच भूमिका घेतली असती असे उत्तर गोपीचंद पडळकर यांनी दिले.