पुणे: लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात हायव्होल्टेज लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार या दोघांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. एकीकडे अजित पवार फडणवीसांच्या साथीने बारामतीत नवे मित्र जोडताना दिसत आहेत. त्याचवेळी शरद पवार यांनी आपल्या जुन्या विरोधकांच्या भेटीगाठी घेण्याची मोहीम सुरु केली आहे. 


या मोहिमेचाच एक भाग म्हणून शरद पवार यांनी गुरुवारी माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव (Dadasaheb Jadhavrao) यांची भेट घेतली. शरद पवार हे पुरंदर तालुक्यातील दिवे येथील दादासाहेबांच्या निवासस्थानी गेले होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बारामती लोकसभेसाठी पाठिंबा मिळवण्याच्यादृष्टीने शरद पवार यांनी दादासाहेब जाधव यांची भेट घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दादासाहेब जाधवराव हे तब्बल 35 वर्षे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यावेळच्या राजकारणात ते  शरद पवार यांचे विरोधक होते. 


शरद पवार 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करताना दादासाहेब जाधवराव यांना उद्देशून एक वक्तव्य केले होते. त्यावेळी दादा जाधवराव यांचे वय 69 इतके होते. याच वयाचा दाखला देत शरद पवार यांनी म्हटले होते की, “बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो,”. शरद पवार यांचे हे वक्तव्य प्रचंड गाजले होते. बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवार हे त्याच दादा जाधवराव यांच्या घरी गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली होती. 


दादा जाधवराव यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?


शरद पवार यांनी दादा जाधवराव यांच्या घरी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, अधूनमधून दादा जाधवराव आणि माझी भेट होत असते. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आम्ही लोक एकत्र होतो. विरोधक पण होतो आणि मित्र तर कायमच होतो. माझ्यासोबत ते मंत्रिमंडळात देखील होते, कृषीमंत्री असताना त्यांनी चांगलं काम केले होते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.


अजित पवारांना प्रत्युत्तर


यावेळी शरद पवार यांना अजितदादांनी केलेल्या एका वक्तव्याविषयी विचारणा करण्यात आली. अजित पवार यांनी म्हटले होते की, पूर्वी शरद पवार उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बारामतीत फक्त शेवटच्या सभेसाठी यायचे आणि विजय मिळायचा. मात्र, आता त्यांना रोज फिरावे लागत आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी म्हटले की, जे टीका करतात, त्यांच्यावरती विश्वासाने सर्व सोपवलं होतं. त्या विश्वासाला धक्का त्यांनी दिला. त्यामुळे साहजिकच मला फिरावं लागतंय, असे शरद पवार यांनी म्हटले.


आणखी वाचा


एक दिवस असा आणेन, बारामती राज्यात एक नंबरचा तालुका असेल, मला तुमची साथ हवी; अजित पवारांचे आवाहन