Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. नारायण सोनी (Narayan Soni) असं या आरोपीचं नाव असून, तो मूळचा बिहारचा (Bihar) आहे. नारायण सोनीला आज (14 डिसेंबर) कोर्टात हजर केलं जाणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी IPC च्या कलम 294, 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


मागील 4-5 महिन्यांपासून धमकी 


आरोपी नारायण सोनी हा गेल्या  4-5 महिन्यांपासून शरद पवार यांना (Sharad Pawar Gets Death Threat) धमकी देत होता. पवारांच्या घरी कॉल करुन जीवे मारण्याचा धमकी नारायण सोनीकडून येत होती. 






मनोरुग्ण नारायण सोनीची कहाणी 


दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण सोनी हा मनोरुग्ण आहे. नारायण सोनी हा 10 वर्ष पुण्यात राहिला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. मात्र दोघांचं बिनसल्याने दोघेही वेगळे झाले. पत्नीने नारायण सोनीला सोडून दुसऱ्या व्यक्तीशी लगीनगाठ बांधली.


पवारांनी मध्यस्थी न केल्याचा आरोप 


दरम्यान, शरद पवारांनी पती-पत्नीच्या भांडणाप्रकरणात काहीही कारवाई केली नसल्याचा राग नारायण सोनीच्या मनात होता. त्यातूनच त्याने शरद पवारांना धमकी दिल्याची माहिती आहे.


नारायण सोनीला बेड्या 


दरम्यान, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नारायण सोनीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. 


शरद पवारांना धमकी 


दरम्यान, शरद पवार यांना वाढदिवसाच्या (Sharad Pawar Birthday) दुसऱ्या दिवशी जीवे मारण्याची धमकी आली होती. मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) येथील घरी फोन करुन त्यांना धमकी देण्यात आली.  मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलाने ठार मारणार असल्याचं धमकी पवारांना देण्यात आली होती. धमकी देणारी व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. आता ही व्यक्ती म्हणजे नारायण सोनी असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.


संबंधित बातमी


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल