धाराशिव : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन आता जवळपास महिना होत आहे. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशनही नागपूर येथे संपन्न झाले. त्यानंतर, राज्यात मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्‍यांना खातेवाटपही करण्यात आलं आहे. मात्र, अद्यापही काही मंत्र्‍यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला नसल्याचे समोर आलं आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेटची पहिली बैठक गुरुवारी 2 डिसेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. मात्र, राज्यातील सरकारमध्ये मंत्री नावालाच असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच सरकार चालवतात, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. आता, सुप्रिया सुळेंच्या (Supriya sule) या टीकेवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. तसेच, सुप्रिया सुळेंनी घरी बसून शेती करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.  


तुळजापूर दौऱ्यावर असलेल्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केलीय. देवेंद्र फडणवीस एकटेच सरकार चालवतात अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती, त्यावर विखे पाटील यांनी खोचक उत्तर देत बाप-लेकींना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. ''जनतेनं तुम्हाला नाकारलं आहे, जनाधार नसलेल्या यांनी आता घरी बसावं. शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना टोला लगावला. तसेच, सुप्रिया सुळेंनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वांग्याच्या शेतीबाबत मार्गदर्शन करावं, कारण वाग्याचे, बटाट्याचे पैसे एवढंच त्यांचं काम आहे,'' असेही विखे पाटील यांनी म्हटले. 


सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज एक पत्र लिहणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दीड महिने झाले सरकारला पण मुख्यमंत्री एकटे ॲक्शन मोडमध्ये दिसतात, बाकी कोणी दिसत नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. मी मागच्या वेळेस जे बोलले ते तुम्हाला 2025 मध्ये हळू हळू दिसेल. वित्तीय तूट व्यवस्थापन हा कायदा जो अटलजी यांनी आणला होता त्याबद्दल विचार केला पाहिजे. अनेक एक्स्पर्ट जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहेत, असेही सुळे यांनीम म्हटलं आहे.


हेही वाचा


भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा