मुंबई : शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या भेटीत ईडी (ED) कारवाईबाबत चर्चा झाल्याचं समजतं. जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाला ईडीची नोटीस आल्याने चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक झाली. या बैठकीतून मार्ग काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, असंही सूत्रांनी म्हटलं आहे.


जयंत पाटील हे अजित पवार गटाला पाठिंबा देणार?


गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत पाटील हे अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर प्राथमिक चर्चा झाल्याचीही माहिती होती. काल पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त बैठक झाल्याचं समोर आलं. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाला ईडीची नोटीस आली, त्यातून मार्ग काढण्यासाठीच ही गुप्त बैठक पार पडल्याचं समजतं. लवकरच जयंत पाटील हे अजित पवार गटाला पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचं कळतं.


पुण्यात गुप्त भेट


राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारी घटना घडली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याचं समोर आलं आहे. अजित पवार यांनी उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्कमधील बंगल्यावर ही भेट घेतली. यावेळी काका-पुतण्यामध्ये दीर्घ चर्चा झाल्याचं स्पष्ट झालं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. पवार काका-पुतण्याच्या भेटीनंतर आता राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. पुण्याच्या चांदणी चौकातील प्रकल्पाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार हे कोरेगाव पार्कमधील चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले आणि तिथेच ही भेट झाली.


हेही वाचा


Ajit Pawar Chandani Chowk : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघंही वेडे नाहीत, असं अजित पवार का म्हणाले?