Swami Avimukteshwaranand Saraswati: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला मराठी शिकवावी, मी दोन महिने मुंबईत असणार आहे. मला मराठी शिकवावी, मी मराठी शिकू इच्छित आहे. तुम्ही मला मराठी शिकवा, मी देशभरात मराठी शिकवेन. दोन महिन्यानंतर मी जेव्हा इथून जाईन, तेव्हा त्यांच्यासोबत मराठीत बोलूनच जाईल, असं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Swami Avimukteshwaranand Saraswati) म्हणाले होते. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगली होती. याचदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची भेट घेऊन आर्शीवाद घेतले. यावेळी जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रकाश सुर्वे यांच्यासोबत मराठीत संवाद साधला. 

एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून मराठी भाषेवरून राजकारण केले जात असताना मुंबई दौऱ्यावर असलेल्या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत मराठीत संवाद साधला. तसेच मला मराठी शिकवा, असं अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य म्हणाले. यावर उद्यापासून शंकराचार्य यांना मराठी शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे प्रकाश सुर्वे यांनी सांगितले आहे. शंकराचार्य हे मराठीत बोलतात दीड महिन्यानंतर ते स्पष्ट मराठी बोलतील असा दावाही प्रकाश सुर्वे यांनी केला आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे मुंबई दौऱ्यावर असून चातुर्मासनिमित्त मुंबईच्या बोरिवली येथील कोरा केंद्र मध्ये 33 कोटी यज्ञकुंडाचं आयोजन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील संतांचं ज्ञान हे मराठीत-

महाराष्ट्रातील संतांचं ज्ञान हे मराठीत आहे, मी ते ज्ञान ग्रहण करू इच्छित आहे, असेही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटल आहे. महाराष्ट्रातील यापूर्वीच्या एकनाथ शिंदे सरकारने गाईंना राज्यमातेचा दर्जा देत सन्मान केला. मात्र, सध्याच्या सरकारने कुठलाही प्रोटोकॉल बनवला नाही, असे म्हणत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. 

ठाकरे हेच महाराष्ट्राच्या बाहेरुन आलेत- शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

मराठीला कानशि‍लात लगावणारी भाषा बनवल्याने यश मिळेल का?, हिंदी ही राजभाषा आहे, त्याचा प्रोटोकॉल बनतो, असे म्हणत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी हिंदी-मराठीच्या भाषेवर आपली थेट प्रतिक्रिया दिली. ठाकरे हेही महाराष्ट्राच्या बाहेरुन आले होते, ठाकरे मगधमधून आले होते, त्यांनाही मराठी येत नव्हती. महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले आणि आज तेच मराठीसाठी भांडत आहेत, असे म्हणत सरस्वती महाराजांनी ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्यावरुन परखडपणे भूमिका मांडली. राज ठाकरेंबाबत बोलू तर, याचा अर्थ देशातील कायदा व्यवस्था समाप्त झाली आहे. कुणी सार्वजनिक ठिकाणी उभे राहून मारहाण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहे. म्हणजेच, कॉन्स्परन्सी आहे की, लॉ अँड ऑर्डर धोक्यात आहे, असेही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले. 

राज्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

ठाकरे हेच महाराष्ट्राच्या बाहेरुन आले; हिंदी-मराठीच्या वादावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरांची पहिली प्रतिक्रिया