Raj Thackeray-Uddhav Thackeray: महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत. मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance) एकत्र आले, ते राजकीयदृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे, असं आजच्या शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या सामनाच्या रोखठोकमधून म्हटलं आहे. दिल्ली,महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील. ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आहे, असंही रोखठोकमधून म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांआधी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीवर भाष्य करु नये, असे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता संभ्रम नको, असं आवाहन रोखठोकद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरे युतीबाबत नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे 5 जुलै रोजी मराठी विजय सोहळ्यांत एकत्र आले. त्यानंतर लोकांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. मराठीवरील अन्याय सहन करणार नाही व त्यासाठी एकजुटीने लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकांत निर्माण झाला. दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे, पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही. मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जेथच्या तेथेच आहेत. हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ती युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील, असं रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात काय घडलं?, रोखठोकमधून खळबळजनक दावा

मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत. त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल व आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची सगळ्यांत जास्त भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटते. ते बरोबर आहे. एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होउढन लगेच दिल्लीत गेले. त्यांचे गुरू अमित शहांना भेटले. “महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते थांबवा. फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही.” यावर अमित शहा यांनी विचारले, “काय करायचे?” त्यावर शिंदे म्हणाले, “मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो. मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गारंटी देतो.” शहा – शिंदे यांच्यात ही चर्चा झाली व अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे.

संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात पडेल-

शिंदे गटाचे उदय सामंत, शिरसाट अशा प्रकारचे मंत्री विधानसभेत उघडपणे बोलत होते की, “शहा व शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील. राज व उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत.” शिंदे यांचे मंत्री ही विधाने कशाच्या बळावर करतात? ठाकरे आपल्या दबावाखाली येतील या कल्पनेत कोणी असतील तर ते मूर्ख आहेत. कोणताही दबाव आता मराठी माणूस स्वीकारणार नाही. वरळीनंतर मीरा – भाईंदर येथे ज्या पद्धतीने मराठी एकजूट उसळली ही खदखद सर्वच पातळीवर आहे. मुस्लिम समाजाबद्दल एकेकाळी नव्हता त्यापेक्षा जास्त रोष मुंबई – महाराष्ट्रात गुजराती, जैन समाजाबद्दल उफाळून येत आहे. तो अमित शहांच्या महाराष्ट्रद्वेष्ट्या राजकारणामुळे. हा संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, शहरात बाहेर पडेल असेच चित्र आहे.

राज्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray On Raj Thackeray: शिवसेना ठाकरे गट अन् मनसेच्या युतीवर बोलू नका, राज ठाकरेंचा आदेश; उद्धव ठाकरे म्हणाले...