मुंबई : राज्यात मराठीच्या (Marathi) मुद्द्यावरुन वाद पेटला असून तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावरुन शिवसेना-मनसे एकत्र आल्याने मुंबईतील (Mumbai) दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उत्साही आहेत. मात्र, मनसे कार्यकर्त्यांकडून मराठीच्या मुद्द्यावरुन होणाऱ्या मारहाणीवरुन अनेकांनी ठाकरेंच्या विरुद्ध भूमिका घेतली. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मराठी जणांवर हल्लाबोल केला, तर भाजप नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर जोरदार टीका केली. आता, हिंदी-मराठीच्या वादात जगद्गुरु शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे ठाकरे बंधूंवर टीका करत, आपण मराठी शिकायला तयारी आहे, मी 2 महिने मुंबईत आहे, त्यांनी मला मराठी शिकवावी, असेही शंकराचार्यांनी म्हटलं आहे.
देशभरात आज गुरु पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत असून गुरु जणांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिष्य गर्दी करत आहेत. राजकीय गुरू असलेल्या ठाकरेंच्या बंगल्यावरही कार्यकर्ते गुरु पौर्णिमेनिमित्ताने गर्दी करताना दिसून येतात. दुसरीकडे गुरूपर्य शंकराचार्य यांच्या दर्शनासाठीही भाविक, शिष्यांनी मुंबईत गर्दी केली आहे. त्यातच, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मराठीवरुन राज ठाकरेंच्या भूमिकेवर हल्लाबोला केला, देशात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, असे शंकराचार्य यांनी म्हटलं.
मराठीला कानशिलात लगावणारी भाषा बनवल्याने यश मिळेल का?, हिंदी ही राजभाषा आहे, त्याचा प्रोटोकॉल बनतो, असे म्हणत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी हिंदी-मराठीच्या भाषेवर आपली थेट प्रतिक्रिया दिली. ठाकरे हेही महाराष्ट्राच्या बाहेरुन आले होते, ठाकरे मगधमधून आले होते, त्यांनाही मराठी येत नव्हती. महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले आणि आज तेच मराठीसाठी भांडत आहेत, असे म्हणत सरस्वती महाराजांनी ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्यावरुन परखडपणे भूमिका मांडली. राज ठाकरेंबाबत बोलू तर, याचा अर्थ देशातील कायदा व्यवस्था समाप्त झाली आहे. कुणी सार्वजनिक ठिकाणी उभे राहून मारहाण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहे. म्हणजेच, कॉन्स्परन्सी आहे की, लॉ अँड ऑर्डर धोक्यात आहे, असेही शंकराचार्यांनी म्हटलं.
तुम्ही मला मराठी शिकवा, मी देशभरात शिकवेन
राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी मला मराठी शिकवावी, मी दोन महिने मुंबईत असणार आहे. मला मराठी शिकवावी मी मराठी शिकू इच्छित आहे. तुम्ही मला मराठी शिकवा, मी देशभरात मराठी शिकवेन. दोन महिन्यानंतर मी जेव्हा इथून जाईन, तेव्हा त्यांच्यासोबत मराठीत बोलूनच जाईल, असेही शंकराचार्य सरस्वती यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रातील संतांचं ज्ञान हे मराठीत आहे, मी ते ज्ञान ग्रहण करू इच्छित आहे, असेही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटल आहे. महाराष्ट्रातील यापूर्वीच्या एकनाथ शिंदे सरकारने गाईंना राज्यमातेचा दर्जा देत सन्मान केला. मात्र, सध्याच्या सरकारने कुठलाही प्रोटोकॉल बनवला नाही, असे म्हणत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा
कराडवरुन पोट्रेट अन् मुंबईतून चाफ्यांचा हार; गुरुवर्य राज ठाकरेंसाठी 'शिवतीर्थ'वर शिष्यांची गर्दी