सोलापूर : मोहोळचे (Mohol)  माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam)  यांनी महायुतीला (Mahayuti)  पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत रमेश कदम यांच्याकडून भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करण्यात आला. मोहोळ येथे रविवारी संध्याकाळी रमेश कदम यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी जाहीर सभा बोलावली होती. या सभेला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीमुळे सोलापूर लोकसभेच्या वर्तुळात मोठी चर्चा झाली. चार दिवसापूर्वी भाजप नेते संजय क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. रमेश कदम अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळ्याप्रकरणी गेले अनेक वर्ष तुरुंगात होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांची जामीनावरती सुटका झाली. या सुटकेनंतर ते लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा झाल्या.


एमआयएमकडून रमेश कदम यांना लोकसभेची ऑफर देखील देण्यात आली होती. ही चर्चा पुढे न गेल्याने रमेश कदम यांनी सोलापुरात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र रमेश कदम कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर रमेश कदम यांनी आपली भूमिका जाहीर करत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. "लोकसभेपुरता माझा भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा आहे मात्र आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मतं त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर रमेश कदम हा माझा जीवश्च कंठश्च मित्र असून आगामी काळात ते दिसून येईल अशी प्रतिक्रिया मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.


मोहोळ मतदारसंघातील विकासाचे मूळ प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीपा पाठिंबा देत आहे.  देशाच्या विकासात आपला खारीचा वाटा असावा या दृष्टीकोनातून फक्त  लोकसभेकरता महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.  राजकारणात भावनिक होऊन चालत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र या मतदारसंघात स्वतंत्र काम करणार आहे. माझे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणार आहे. येणारी 2024 ची निवडणूक मी लढवणार आहे. हा पाठिंबा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आहे. 


एमआयएमचा प्रस्ताव नाकारला


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या उमेदवारी संदर्भात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार रमेश कदम यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी मला लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी तो नाकारला अशी माहिती देखील रमेश कदम यांनी या वेळी दिली .    


कोण आहेत रमेश कदम? (Who Is Ramesh Kadam) 


रमेश कदम हे 2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळमधून निवडून आले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी मागेल त्याला टँकर, मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्या ठिकाणी रस्ता दिल्याने चांगलेच लोकप्रिय झाले. आण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळामध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 


तुरुंगातही वादग्रस्त ठरले होते


रमेश कदम हे तुरुंगातही गेल्यानंतर चांगलेच वादग्रस्त ठरले होते. तुरुंगात असताना त्यांनी पोलिसांना केलेली शिविगाळ असो वा वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. रमेश कदम हे जवळपास आठ वर्षे तुरुंगात होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले. रमेश कदम हे मांतग समाजातून असून या समाजाची मोठी संख्या आहे. तसेच मोहोळ आणि पंढरपूर परिसरात रमेश कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तुरुंगात असताना ज्या ज्या वेळी ते जामीनातून बाहेर यायचे त्या त्यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी व्हायची. आताही त्यांचं मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं.  


हे ही वाचा:


Madha : डोळ्यात पाणी आणून आणखी एका धनगर नेत्याने भाजपची साथ सोडली, माढ्यामध्ये राष्ट्रवादीचं बळ वाढलं