मुंबई : संविधानाच्या (Constitution) 75 वर्षाच्या गौरवशाली प्रवासावर संसदेत शनिवारी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेस, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर  सडकून टीका केली. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.  


संजय राऊत म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून या देशात कोणतेही कृत्य संविधानाला धरून चाललेले नाही. या देशाचे न्यायालय, निवडणूक आयोग, संसद यांना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मोदींच्या राज्यात उद्ध्वस्त झाले आहेत. न्यायव्यवस्था दबावाखाली आहे, निवडणूक आयोग राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करत आहे. हे संविधानाला धरून नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी संविधानावर बोलू नये. तो संविधानाचा अपमान ठरेल. मोदींनी सांगावे की, गेल्या दहा वर्षात त्यांनी संविधान मजबूत करण्यासाठी कोणते कार्य केले? असा हल्लाबोल त्यांनी केलाय.  


भाजपवाले दूध के धुले आहेत का? 


संजय राऊत पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाला लोकसभेत महत्त्वाचे स्थान आहे. पण, विरोधी पक्ष राहू नये, विरोधी पक्ष आपल्या टाचेखाली असावा. तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावावा. त्यांना तुरुंगात टाकावे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले, हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलेले आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व लोक दूध के धुले आहेत का? ईडी, सीबीआय भाजपच्या घरी कधी गेली का? हे दाखवा. उलट ज्यांच्या घरी गेली होती ते आज मोदींच्या मांडीवर बसले आहेत. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप मोदींनी केला. त्याच अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाते. हे कोणत्या संविधानात लिहिले आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.  


संविधान देशाचा आधार, तो नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केलाय


जे आमदार फोडले ते सर्व दहाव्या शेड्युलनुसार अपात्र ठरले पाहिजे होते. पण नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. हे संविधानात बसते का? चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे. ज्या पद्धतीने हे राज्य मोदी चालवत आहेत ते संविधानाच्या विरोधात आहे. संविधान हा देशाचा आधार आहे. तो आधार नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केलाय. नरेंद्र मोदी हे या देशाला लाभलेले 65 वर्षातील असत्य बोलणारे सगळ्यात महान पंतप्रधान आहेत. गेल्या दहा वर्षात फक्त असत्याचा विजय करण्याचे काम मोदींच्या काळात झाले आहे. मोदींचा नवीन संविधानकर्ता कोणी असेल तर तो गौतम अदानी आहे. गौतम अदानीला जे विरोध करतात ते संविधान विरोधी आहेत. 370 कलम हटवून काश्मीरमध्ये काय दिवे लावले? आजही जवानांच्या हत्या होत आहेत. आजही काश्मीरमधील तरुण बेरोजगार आहेत. सैन्याच्या ताकदीवर राज्य सुरू आहे. आता काश्मीरचा विषय संपला आहे. तुम्ही मणिपूरला जाऊन दाखवा. गौतम अदानींना सांगा मणिपूरमध्ये एखादी प्रॉपर्टी घेऊन दाखवा, असे आव्हान संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. 


आणखी वाचा


Maharashtra Cabinet Expansion: महायुतीकडून आज कोण कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची संभाव्य मंत्र्याची संपूर्ण यादी!