कल्याण: मराठी माणसांविषयी गरळ ओकत कल्याण परिसरातील देशमुख कुटुंबीयांना परप्रांतीय सरकारी अधिकारी आणि त्याच्या गुंडांनी माराहाण केल्यामुळे सध्या राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कल्याणच्या योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा हाईटस् या इमारतीमध्ये अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे शेजारी राहतात. घराबाहेर मोठ्याप्रमाणावर धूप लावण्याच्या वादातून शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे यांच्यात वाद झाला होता. या वादात बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याच रागातून अखिलेश शुक्ला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या टोळक्याने देशमुख बंधुंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये अभिजित देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कल्याण परिसरात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता या वादात उडी घेतली आहे.
मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी अखिलेश शुक्ला यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, योगीधाम परिसरात एक किरकोळ वाद झाला होता. शुक्ला नावाचा व्यक्ती दिव्याचा वापर करतो, त्याने कळवीकट्टे आणि देशमुख कुटुंबाला मारहाण केली. अभिजित देशमुख यांनी अवस्था जगतो की मरतो, अशी झाली आहे. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आम्ही देशमुख कुटुंबाच्या सोबत आम्ही पूर्ण ताकदीने मागे आहोत. 24 तासांत आरोपीला अटक केली नाही तर मनसे रस्त्यावर उतरणार. आम्ही रस्त्यावर उतरल्यावर काय होईल माहिती आहे. आम्ही शुक्लाला जिथे असेल तिथून आमच्या पद्धतीने उचलून पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
मराठी माणसांना अर्वाच्य शिव्या देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या माणसाविरोधात कायदेशीर कारवाई करा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला शिव्या देणाऱ्या शुक्लाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) सरळ करेलच पण मराठी माणसाने देखील आता जागं व्हायला हवं. यापुढे जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या पाठी उभी राहते. त्याचप्रमाणे मराठी जनतेने देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठी उभं रहायला हवे, असे उल्हास भोईर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा