नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी एक एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विधानसभेतील भाषणानंतर जे काय घडलं ते मांडलं आहे. विधानसभेतील भाषणानंतर आलेले फोन समर्थन देणारे होतेच पण एक वाक्य खटकल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. याशिवाय शोषितांच्या बाजूनं  उभं राहिलं पाहिजे ही महाराष्ट्राच्या मातीची शिकवण कधी विसरणार नाही, हे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. याशिवाय वाल्मिक कराड यांच्याबाबत देखील आणखी काही मुद्दे त्यांनी उपस्थित केले.


जितेंद्र आव्हाड यांची एक्स पोस्ट जसंच्या तसं :


कालच्या माझ्या भाषणानंतर जे काही मला फोन आले; त्यातील ९९% फोन हे माझे समर्थन करणारे होते. पण, महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती किती प्रबळपणे उभारल्या गेल्यात हे प्रत्येक फोनमधून ध्वनित होत होते. यातील एक वाक्य मला खूपच खटकले, "साहेब, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात."  मी माझ्या भाषणातच सांगितले होते की, ' मी वंजारी आहे. मी वाल्मिक कराडच्या विरोधात बोलतोय. तो पण वंजारीच आहे.' यामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आहे. जिथे अन्याय- अत्याचार होतो; त्याविरोधात उभे ठाकलेच पाहिजे.अन्याय करणाऱ्याला जात नसते आणि ज्याच्यावर अन्याय होतो, त्यालाही जात नसते आणि अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यानेही जात तपासू नये. 



मी भुसावळच्या प्रकरणात मणियार चाचाची बाजू घेतली. तेव्हा अनेकांनी माझे कौतूक केले आणि अनेकांनी माझ्यावर टीकाही केली. पण त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली की, जर मणियार चाचाच्या जागी माझा बाप असता तर मी काय केले असते किंवा तुम्ही काय केले असते?  तिथे धर्म आड आला. अनेकवेळा मी दीन-दलित,  शोषित- पीडितांची बाजू घेत असतो.  तेव्हाही जातीपातीचे राजकारण आड येत असते. वर्षानुवर्ष ज्या समाजावर अन्याय होत असतो; त्या समाजासाठी आपण बोललेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे.  ही भूमिका शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतूनच येते. 



शोषक हा वेगळा आणि शोषित हा वेगळा समाज आहे. आपण कुठल्याही समाजाचे असू पण शोषितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, हेच महाराष्ट्राची माती कायम शिकवत आली आहे अन् ही शिकवण मी तरी कधी विसरणार नाही. मी जे काल बोलायला विसरलो ते खाली लिहितोय...


* वाल्मिक कराड चप्पल का घालत नाही? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राने जरूर विचारावे.  
* 200 च्या वर एफआयआर नोंदवणारा वाल्मिक कराड हा एफआयआर नोंदवायला पोलीस स्टेशनला किती वाजता जातो की पोलीस त्याच्या घरी येऊन सह्या घेतात? याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. 
* प्राजक्ता धस या भगिनीवर अन्याय होतो. न्याय मिळविण्यासाठी त्या वेगवेगळे दरवाजे ठोठावतात.आजही त्या प्राजक्ता धस यांना न्याय मिळत नाही. त्यांना न्याय कोण देणार? 


आणखी खूप प्रश्न आहेत. बीडमधील खुनांची मालिका ही एखाद्या सिरियल किलरने केलेल्या खुनांप्रमाणे आहे.  एखाद्या पुस्तकात जे आपण वाचले असते की, एकाने 40 खून केले; 50 खून केले, नंतर ते उघडकीस आले. असाच एक सिरियल किलर आपणाला ठेचायचा आहे अन् त्या सिरियल किलरचे नाव आहे, वाल्मिक कराड!


जितेंद्र आव्हाड यांची एक्स पोस्ट 






इतर बातम्या :


Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?