मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारच्या काळात समित कदम या माणसाला पाठवले होते. या समित कदमने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध आम्ही सांगतोय ते आरोप करा, अन्यथा जेलमध्ये जा, असा प्रस्ताव ठेवल्याचा आरोप अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला होता. याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
अनिल कदम यांनी समित कदम याच्याबाबत जे आरोप केले ते खरे आहेत. समित कदम या व्यक्तीने असे कोणते काम केले आहे की, त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्याचा गृहमंत्री कोण आहे? आम्ही अजून उत्खनन करू. देवेंद्र फडणवीस यांनी अशा अजून किती लोकांना सुरक्षा दिली आहे हे तपासावे लागेल. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात तिरस्कारणीय व्यक्ती झाले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. समित कदमने अनिल देशमुख यांच्यासमोर तीन प्रतिज्ञापत्र ठेवली. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याविरुद्धच्या गंभीर आरोपांचा उल्लेख होता. हे धमकी देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. मी त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना खलनायक म्हणतो, असे संजय राऊत यांनी म्हटले. जे देवेंद्र फडणवीस यांच्या दबावासमोर झुकले नाहीत, ते तुरुंगात गेले. जे झुकले ते भाजपसोबत केले. अजित पवार यांनी स्वत:च ते वेष पालटून दिल्लीत गेले होते, हे सांगितले. एकनाथ शिंदेही काळी दाढी पांढरी करुन दिल्लीत फिरत होते, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
संघाचे लोक तुमच्याकडे येतात आणि धमकावतात: संजय राऊत
समित कदम हा मिरजेतील लायझनिंग करणारा माणूस आहे. आता फडणवीसांची टोळी त्याच्याशी आमचा संबंध नसल्याचे सांगेल. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधून सत्य समोर आले आहे. मलादेखील धमकी देण्यात आली होती. मी याबाबत राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून कळवले होते. तुम्ही सरकार स्थापन करण्याचा नाद सोडा, नाहीतर तु्म्हाला जेलमध्ये टाकू, अशी धमकी मला काही लोकांनी दिली होती. संघ परिवाराचे लोक कशाप्रकारे तुमच्याकडे येतात, हे मला माहिती आहे. ते आधी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतात. आपण ऐकलं नाही की ते धमकावतात, इशारे देतात. तुमचं भविष्य कसं धोक्यात आहे, हे सांगतात. तुम्हाला ईडी आणि सीबीआयच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल, असं सांगून ओढून नेतात, असे संजय राऊत यांनी म्हटले.
भाजपचे जे लोक ज्या देवामुळे फायदा होतो, त्याचेच नाव घेतात: राऊत
भाजपवाले आता रामाचे नाव घेत नाहीत. ते परत रामला गर्भगृहात टाकतील. ज्या देवाचा फायदा होईल त्याच देवाचे नाव भाजपवाले घेतात. जय जगन्नाथ केलं आणि ओडिशात जागा मिळवल्या . आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं की, आम्ही कारसेवा केली, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा