नाशिक: मोठ्या दंगली घडवणारे मास्टरमाईंड नेहमी सरकारमध्येच असतात. आताही नागपूर दंगलीसाठी चिथावणी देणाऱ्या फहीम खान याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पण या दंगलीची (Nagpur Riots) ठिणगी टाकणारे तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत. आज तुमच्याकडे सत्ता आहे, पण बहुमत फार चंचल असतं, कधी इकडे-तिकडे सरकेल सांगता येत नाही. मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या होत्या, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकार देशद्रोहाचे गुन्हे दाखल करत आहे, बुलडोझर फिरवून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पण नागपूर दंगलीची ठिणगी टाकणारे तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत. तुम्ही जर निष्पक्ष राज्यकर्ते असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगत असाल तर शिवाजी महाराजांनी प्रजेला त्रास देणाऱ्या आपले सहकारी आणि नातेवाईकांनाही सोडलं नव्हतं, ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावी. तुमच्या मंत्रिमंडळातील लोक कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे एकप्रकारे गृहमंत्र्यांना आव्हान आहे, हे देवेंद्र फडणवीसंनी समजून घ्यावे. विरोधकांवर नुसता चिखलं उडवणं याला राज्य करणं म्हणत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांना, मात्र पुढील पाच वर्षे राज्यात विरोधकांना संधी नाही ना, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, मी फार सकारात्मक माणूस आहे. मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेला माणूस आहे. मी शेवटचा मालुसरा आहे. बहुमत फार चंचल असतं, ते कधी इकडे-तिकडे सरकेल सांगता येत नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
शिवसेना-भाजप युती तुटू नये, यावर त्यावेळी फडणवीस ठाम होते: संजय राऊत
2014 साली एका-एका जागेवर 72 तास चर्चा झाली होती. मी त्यामध्ये होतो. ओम प्रकाश माथुर भाजपचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्की सांगेन, की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते. हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. तेव्हा युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपचा वरुन कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली, असे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊतांनी पुन्हा एकदा फडणवीसांची कड घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा
फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण...; राऊतांनी सगळंच सांगितलं!