Kunal Kamra Controversy: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आता याप्रकरणी कुणाल कामरानं एक पोस्ट करुन आपलं मत सविस्तर मांडलं आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तसेच, या पोस्टमधून माफी मागणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. 

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरानं एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर टीका करताना एक विडंबनात्मक गाणं सादर केलं. हे गाणं गाताना कुणालनं एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' असा अप्रत्यक्ष उल्लेख केला. व्हिडीओ व्हायरल होताच, शिवसेना (शिंदे गट) नेते आणि समर्थकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. हे गाणं व्हायरल झाल्यानंतर, रविवारी (23 मार्च) शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार परिसरातील 'द युनिकॉन्टिनेंटल' हॉटेलची तोडफोड केली, जिथे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा शो ज्या स्टुडिओमध्ये झाला, त्या स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर वाद वाढला आणि याप्रकरणी कुणाल कामराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. 

कुणाल कामराची प्रतिक्रिया समोर  

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरानं याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. त्यानं आपल्या इन्स्टा हँडलवरुन एक लांबलचक पोस्ट करुन या संपूर्ण प्रकरणावर अजिबात माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या संपूर्ण पोस्टमध्ये कुणालनं सर्वात आधी त्या जमावार निशाणा साधला, ज्यानं स्टुडिओची तोडफोड केलेली. 

स्टुडीओची तोडफोड करणाऱ्यांवर कुणालचा निशाणा 

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये कुणालनं लिहिलंय की, "एन्टरटेन्मेट वेन्यू फक्त एक प्लॅटफॉर्म आहे. सर्व प्रकारच्या शोसाठी ती एक जागा आहे. हॅबिटेट (किंवा इतर कोणतंही स्थळ) माझ्या कॉमेडीसाठी जबाबदार नाही, नाही यावर कुणाचाही कंट्रोल आहे, जे काही मी बोलतो किंवा करतो... नाही माझ्या काही बोलण्यावर किंवा कृतीवर कोणत्याही राजकीय पक्षाचा कंट्रोल आहे." 

"एखाद्या कॉमेडियनच्या शब्दांसाठी कोणत्याही स्थळावर हल्ला करणं तेवढाच मूर्खपणा आहे. जेवढा तुमच्या ताटात वाढण्यात आलेलं बटर चिकन तुम्हाला आवडलं नाही, म्हणून तुम्ही जाऊन टॉमेटो घेऊन जाणारा ट्रक पलटी करण्यामध्ये आहे.", असं कुणाल कामरा म्हणाला. 

धमकी देणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत कुणाल काय म्हणाला? 

कुणालनं पोस्टमध्ये धमकी देणाऱ्या राजकीय नेत्यांनाही सुनावलं आहे. कुणालनं लिहिलंय की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आमच्या अधिकाराचा वापर केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची चापलूसी करण्यासाठी केला जाऊ नये, जरी आजचा मीडिया आम्हाला याचा उलट्या पद्धतीनं विश्वास देण्याचा प्रयत्न करत असला तरीसुद्धा..." 

कुणाल कामरानं पुढे लिहिलं आहे की, "कोणत्याही पॉवरफुल पब्लिक फिगरबाबत केलेली चेष्ठा, मस्करी सहन न करण्याची तुमची असक्षमता माझ्या अधिकारांना बदलू शकत नाही. जेवढं मला माहिती आहे, कोणताही नेता आणि आपली राजकीय व्यवस्थेच्या सर्कसची खिल्ली उडवणं कायद्याच्या विरोधात नाही." 

पोलिसांना आणि कोर्टाला पूर्ण सहकार्य करणार : कुणाल कामरा 

पुढे कुणालनं लिहिलंय की, त्याच्याविरोधातल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी पोलीस आणि कोर्टाला पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी तो तयार आहे. पण, त्यांनी व्यंग्यात्मक स्वरात एक प्रश्न विचारला आणि म्हणाला की, "ज्यांना विनोदानं दुखापत झाली आणि तोडफोड केली त्यांच्याविरुद्ध कायदा निष्पक्ष आणि समानपणे लागू होईल का? आणि हे अशा लोकांसाठी देखील लागू होईल का? जे बीएमसीचे निवडून न आलेले सदस्य आहेत आणि कोणतीही पूर्वसूचना न देता हॅबिटॅटमध्ये पोहोचतात आणि हातोडा वापरतात? पुढच्या वेळी मी एल्फिन्स्टन ब्रिजवर किंवा मुंबईतील इतर कोणत्याही ठिकाणी शो करेन, जे पाडणं खरंच गरजेचं आहे."

मी गर्दीला घाबरत नाही : कुणाल कामरा 

कुणाल कामरानं आपल्या पोस्टमध्ये त्याचा नंबर लीक करणाऱ्यांचा आणि त्याला वारंवार कॉल करणाऱ्यांचाही समाचार घेतला आहे. तो म्हणालाय की, "तुम्हा सर्वांना माहीत असेलच की, अनोळखी नंबर व्हॉइसमेलवर जातात." तसेच, कुणाल कामरानं माध्यमांनाही फटकारलं आहे. तो म्हणाला की, "संपूर्ण वाद हा एक सर्कस आहे आणि त्यामुळेच भारतात प्रेस फ्रीडम 159 व्या क्रमांकावर आहे."

पोस्टच्या शेवटी कुणालनं लिहिलंय की, "मी माफी मागणार नाही... मी जे बोललो तेच अजित पवार (राज्याचे उपमुख्यमंत्री) यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटलं होतं. मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी माझ्या पलंगाखाली लपून ही घटना शांत होण्याची वाट पाहणार नाही." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kunal Kamra Controversy: एकनाथ शिंदेंवर कमेंट करण्यासाठी सुपारी घेतलेली? माफी मागणार? कॉन्ट्रोवर्सीवर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया