Sanjay Raut on Devendra Fadnavis : भाजप-शिवसेना युती 2014 ला कशी तुटली? याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा करून दिली आहे. 2014 साली शिवसेनेला 147 जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलं होतं. पण, विधाताच्या मनात काही वेगळंच होतं, मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं. शिवसेना 151 वर ठाम राहिले आणि युती तुटली, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raaut) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, आता 2025 आहे. पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. 2019 वर पण बोलायला पाहिजे, 2019 ला काय झाले? 2014 साली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते युती तोडण्यासाठी दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते. त्याचं ठरलं होतं की युती तोडायची. चर्चेचा फक्त गुऱ्हाळ सुरू होता. बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते याचा फायदा घ्यावा. शिवसेनेला आपण संपवावे हे त्यांचे धोरण होते. भारतीय जनता पक्षाला पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हते, तेव्हा गावागावात या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवले आहे. शिवसेनेच्या पोटनिवडणुकीच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आपल्यासोबत असेल तरच देशात आणि राज्यात आपण सत्तेत येऊ शकतो, असे भाजपाला त्यावेळी वाटले होते. हिंदूहृदयसम्राट हे महान हृदयाचे नेते होते. त्यांनी सांगितलं होतं की, की मतांची विभागणी नको, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केले पाहिजे. बाबरी प्रकरणानंतर, अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशात निवडणुका लढणार होतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची एक लाट देशात तयार झाली होती. लोकसभेला उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यात 60 ते 65 जागा लढायचे आमचे ठरले होते.
फडणवीसांना युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण...
या लाटेत आमच्या किमान 40 जागा निवडून आल्या असत्या, याची आम्हाला खात्री होती. आमची तयारी सुरु असतानाच आम्ही हे ज्यावेळी जाहीर केले, तेव्हा भाजपचे धाबे दणाणले. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचा बाळासाहेबांना फोन आला. त्यांनी सांगितले की, तुम्ही देशभरात निवडणुका लढत आहात, त्यामुळे भाजपचे नुकसान होऊ शकते. हिंदुत्ववादी मतं विखुरतील. त्यामुळे भाजप हरेल, काँग्रेसला फायदा होईल. मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या. बाळासाहेब महान हृदयाचे माणूस होते. त्यांनी आम्हाला सांगितले, की राज्याबाहेरचे उमेदवार मागे घ्या. अटलजींचा फोन होता, आपण त्यांचा सन्मान राखला पाहिजे. 2014 साली एका-एका जागेवर 72 तास चर्चा चालली होती. ओम माथुर त्यांचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्की सांगेन की, देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते. तेव्हा युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपचा वरुन कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली, असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीसांची कड घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा
