Sanjay Raut on Next CM of Maharashtra : नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी ठाकरे गटाचे (Thackeray Group) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीला (Maha Vikas Aagadi) मिळालेलं यश उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वामुळेच मिळालं असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्री पदाच्या चेहर्‍याशिवाय निवडणूक लढवणं धोकादायक असल्याचं संजय राऊत यांचं मत आहे. 


आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न ठेवून लढवणार असल्याचं ठरलं होतं. पण महाविकास आघाडीनं एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयाच्या विपरीत वक्तव्य संजय राऊतांनी केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा  चेहरा जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी संजय राऊत यांची आहे. 


ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, "आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहुनही झालेलं आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. पण बिन चेहऱ्याचं सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्विकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल."