Sanjay Raut on RSS: मुंबई : संघानं (RSS) ठरवलं तर मोदी सरकार (Modi Government) 15 मिनिटंही राहणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. तसेच, भाजपची (BJP) मातृसंस्था RSS आहे. आम्हाला RSS बद्दल खूप अपेक्षा आहेत. लोकतंत्र वाचविण्यासाठी RSS चं मोठं योगदान आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. तसेच, अजित पवारांवरही संजय राऊतांनी हल्ला चढवला आहे. गुलाम जास्त आवाज करत नाहीत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अश्रित राजे आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. 


ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "आरएसएसबद्दल मी खूप ऐकतोय. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही असंच म्हटलं की, लोकसेवकला अहंकार नसला पाहिजे. पण गेल्या दहा वर्षांत आम्ही पाहिलंय की या देशात केवळ अंहकारच आहे. अहंकार आहे, इर्शा आहे, बदल्याची भावना आहे. सत्तेचा गैरवापरही पाहिलाय. अहंकाराच्या राजकारणाला जनतेनं रोखलं. आम्ही अहंकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिथे जिथे रामाचं वास्तव्य होतं, तिथं तिथं भाजपचा पराभव झाला. भाजपची मातृसंस्था RSS आहे. आम्हाला RSS बद्दल खूप अपेक्षा आहेत. लोकतंत्र वाचविण्यासाठी RSS चं मोठं योगदान आहे. "


गुलाम जास्त आवाज करत नाहीत; अजित पवारांवर राऊतांचा हल्लाबोल 


गुलाम जास्त आवाज करत नाहीत. गुलाम एखाद्या पार्टीचे आश्रीत असतात. ईस्ट इंडिया कंपनी गुजरातला आहे आणि हे अश्रित राजा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अश्रित राजे आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी हल्लाबोल केला आहे. 


अण्णा हलले, अण्णा बोलले आणि अण्णांनी पत्र लिहिलं याबाबत अभिनंदन : संजय राऊत 


"शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत अण्णा हजारे जागे झाले, यांबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. राळेगणसिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली, याबाबत मी अण्णा हलले, अण्णा बोलले आणि अण्णांनी पत्र लिहिलं याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. पण या राज्यात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये घोटाळेच घोटाळे झाले आहेत. अण्णांनी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या घोटाळ्यावर अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन जी खंडणी गोळा केली जातेय, त्यावरही अण्णांनी बोलायला पाहिजे.", असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना अण्णांना खूप काम आहे. फक्त शिखर बँक घोटाळा बघू नका, राज्यात घोटाळेच घोटाळे झाले आहेत. त्यांनी रामलीला मैदानात बसावं, आम्ही त्यांच्यासोबत असू, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 


प्रभू श्रीरामानं नरेंद्र मोदींचा पराभव केला. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाची पूजा केली नाही स्वतःची पूजा केली. अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनेचा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे केवळ मोदींवरच होते, असं म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.