Sanjay Raut: सोलापूर : राज्यात पुढील महिन्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असून राजकीय पक्षांकडून दौरे आणि सभांच्या माध्यमातून जनसंवाद सुरू आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने पदाधिकारी मेळाव्यांचे आयोजन केले जात असून आज नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील मेळाव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोलापूरातील (Solapur) शिवसेना पदाधिकाऱ्यांसाठी सभा गाजवली. येथील सभेतून बोलताना त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर प्रहार केला. तसेच, लोकसभा निवडणुकीतील चारशे पारच्या नाऱ्याला बूच लावण्याचे कामे महाराष्ट्रमध्ये झालं आणि हे कामं उद्धव ठाकरेंनी केल्याचं सांगत विधानसभा निवडणुकांचेही रणशिंग फुंकले. विशेष म्हणजे दक्षिण सोलापूर मतदारसंघावर शिवसेना (Shivsena) उबाठा पक्षाच्यावतीने दावाही करण्यात आला आहे. 


राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपावरुन सर्वच पक्षांमध्ये खलबतं सुरू आहेत. प्रत्येक पक्षांकडून मतदारसंघांवर दावा केला जात आहे. आता, सोलापूर दक्षिण मतदारसंघावर यापूर्वी काँग्रेसचा मतदारसंघ असून आता ठाकरेंच्या शिवेसना पक्षाच्यावतीनेही खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे. सोलापुरातील प्रश्न सोडवयाचे असतील तर दक्षिण सोलापुरात शिवसेनचा आमदार निवडून आणलं पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले. त्यामुळे, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघावर काँग्रेसनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचाही दावा दिसून येतो. त्यामुळे, येथील जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सोलापूर दक्षिण मतदारसंघातील सभेतून राऊत यांनी पोलिसांना चांगलंच सुनावलं आहे. 


पोलिसांनी मेळाव्यासाठी आयोजन करताना त्रास दिला असं मला सांगितलं गेलं. पण केवळ दोन महिने थांबा, मग कोण इथले पोलीस अधिकारी पाहू, राजा की राजकुमार. पोलीस अधिकाऱ्यांनो अशी मस्ती करू नका. तुम्ही आमच्या दारात उभे राहणार आहात हे लक्षात ठेवा, प्रत्येकाची वेळ येते, प्रत्येकाचा हिशोब ठेवा, अशा शब्दात संजय राऊत यांनी पोलिसांनाच दम भरला. तसेच, आमचे पोस्टर काढता, बॅनर काढता, अंगावर वर्दी आहे म्हणून तुम्ही असं वागता?. पण, अधिकाऱ्यांनो असे पक्षपाती वागू नका, अन्यथा आमची सत्ता येणार आहे आणि तुम्ही आम्हाला सलाम ठोकणार आहात हे लक्षात ठेवा, अशा शब्दात संजय राऊतांनी पोलिसांना दम भरला. संजय राऊत यांनी सोलापूरातील भाषणात थेट व्यासपीठावरुनच पोलीस अधिकाऱ्यांना तंबी दिल्याचं पाहायला मिळालं. 


लोकसभेत निवडणूक निकाला फिरवला


लोकसभेच्या 48 पैकी 31 जागा आपण जिंकलो आणि पाच जागा या मिंधे आणि त्यांच्या दरोडेखोरांनी चोरल्या. अन्यथा आपण 40 पर्यंत गेलो असतो.  निवडणूक निकाल लागला होता, मिरवणूक निघाल्या होत्या तेव्हा दिल्लीतून फोन आला आणि निकाल फिरवला गेला.  त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या पराभव झालेला आहे, असे म्हणत लोकसभा निवडणुकांच्या निकालावरही राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच, विधानसभा निवडणूक घ्यायची यांची हिंमत नाही. प्रशासक राज्य आणायचं आणि त्यांच्या माध्यमातून राज्य करायचं हे यांचं काम आहे, असेही राऊत म्हणाले. 


हेही वाचा


मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी