Sanjay Raut : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर त्याच्या घरात चोराने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात सैफ अली खान याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस सरकावर तोफ डागली आहे.
संजय राऊत म्हणाले की, चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. तो एक मोठा कलाकार आहे. काल देशाचे पंतप्रधान मुंबईत होते. त्यामुळे सगळी सुरक्षाव्यवस्था तिकडे होती. पंतप्रधान जरी मुंबईत असले तरी या राज्यात काय चालले आहे हा प्रश्न एकदा राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारायला हवा. आम्ही त्यांच्यावर काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात, वेदना होतात. पण, महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाही. रस्त्यावर, घरात, झोपडीत, चाळीत कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसत आहेत. आता मोठमोठे कलाकार आहेत, यांच्या घराला बाहेर सुरक्षा आहे. त्यांना स्वतःला सुरक्षाव्यवस्था आहे. तिथेही चोर घुसतात आणि हल्ला करतात.
हा तर नरेंद्र मोदींना धक्का
खरे म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे. पंधरा दिवसांपूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत एक तास व्यतीत केला होता. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला झाला, तो चोरांनी केला की कोणी केला? हा पुढचा प्रश्न आहे. पण या राज्यात कोणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणे मुश्किल झाले आहे. हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे, अशी टीका त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
पद्मश्री किताब असलेलाही मुंबईत सुरक्षित नाही
या राज्याचे 90 टक्के पोलीस हे महायुती म्हणून जो काही प्रकार आहे त्यांचे आमदार जे फोडलेली लोक आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी आहेत. आमचा उपशाखाप्रमुख फोडला तर त्याला दोन गनर दिले जातात. जिल्हाप्रमुख असेल तर 5 गनर असतात. पण सामान्य माणसाला कुठलीही सुरक्षा नाही. गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर्स यांना सुरक्षा आहे. सैफ अली खानला देखील सुरक्षा असणार, त्याला भारत सरकारने पद्मश्री दिलेला आहे. पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही हे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. सैफ अली खानवर झालेला हल्ला गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडे पडले आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा