यवतमाळ : जिल्ह्याच्या पुसद येथे आज बंजारा समाजाच्या वतीने वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. संजय राठोड बंजारा समाजाचे नेते असून त्यांना सोशल मीडियावर लक्ष केले जातंय. त्यामुळे कुठेतरी त्यांच्यासोब बंजारा समाजाची बदनामी केली जात आहे. त्यासर्व बाबींना प्रतिउत्तर देण्यासाठी आज मोर्चेकऱ्यांनी पुसदच्या वसंतराव नाईक चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, हा मोर्चा कार्यकर्त्यांची गर्दी न जमल्यामुळे रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली आहे.


समाजातील अनेक लोक हे वाशिम जिल्ह्याच्या पोहरादेवी येथे समन्वय समितीच्या बैठकीसाठी उद्या 15 फेब्रुवारीला एकत्र येणार आहे. त्यादृष्टीने या सर्व प्रकरणात पुढची दिशा ठरणार असताना आज पुसद येथे अर्जुन राठोड या व्यक्तीने कार्यकर्त्यांना घेऊन संजय राठोड यांच्या समर्थनात मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, बंजारा समाजातील अनेक वरिष्ठ मान्यवर यांनी या मोर्चात न जाण्याचा सल्ला मोर्चेकरी यांना खासगीत दिला होता, असेही काहींनी कॅमेरासमोर न बोलता सांगितले.


मोर्चेकऱ्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र
जे काही झाले त्यावर पोहरादेवी येथील बैठकीत बंजारा समाज समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय घेऊन पुढची दिशा ठरणार असताना समाजातील वरिष्ठ नागरिक यांचा सल्ला न मानता संजय राठोड समर्थकांनी आज पुसद येथे मोर्चा काढला. त्याच पुसदच्या मोर्चात कुणीच फिरकले नाही. त्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसुन आले. कालपासून आज दुपारी 12.45 पर्यंत आयोजक मोठा मोर्चा असल्याचे माध्यमांना वारंवार सांगत होते. मोर्चेकऱ्यांपेक्षा मोर्चास्थळावर पोलिसांचीच संख्या मोठ्या प्रमाणात होती. अखेर मोर्चासाठी गर्दी न जमल्याने मोर्चा रद्द करण्याची नामुष्की संजय राठोड समर्थक अर्जुन राठोड आणि मोर्चाचे आयोजक यांच्यावर ओढवली आहे.


आता आम्ही चार लोक पुसद तहसीलदार यांना निवेदन देणार आहोत, असे आयोजकांनी सांगितले. अनेक ठिकाणी कार्यकर्ते आहेत, पण त्यांच्यापर्यंत मोर्चाचा मॅसेज पोहोचला नाही आणि त्यामुळे कार्यकर्ते जमले नाही, अशी सारवासारव मोर्चेकऱ्यांनी केली. एकप्रकारे पुसद येथील मोर्चाचे आयोजक आणि समाजातील वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक नेते असा गट पडल्याने पुसद मोर्चा रद्द करण्याची नामुष्की आयोजक यांच्यावर ओढवली आहे.