मुंबई : काँग्रेसला (Congress) राम राम केलेले संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी आज शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Group) वाटेवर आहेत. संजय निरुपम यांनी 20 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी केली आहे. 2005 साली त्यांनी शिवसेनेची साथ सोडली होती, त्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शिवसेना (Shivsena) शिंदे गटात प्रवेश (Eknath Shinde Group) करत हाती धनुष्यबाण घेतलं आहे. 


संजय निरुपम यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश


दोन दिवसांपूर्वी संजय निरुपम यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. त्यानंतर संजय निरुपम यांनी शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केला होता. आज अखेर त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. संजय निरुपम यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, माझ्यासोबत 400-500 कार्यकते, पदाधिकारी यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज अंतिम फैसला झालेला आहे.


माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार


संजय निरुपम म्हणाले की, 20 वर्षानंतर आज मी स्वगृही परत येत आणि एकटा नाही, तर संपूर्ण कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी आज खूप आनंदी आहे. माझ्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत. गेल्या 20 वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये होतो, 2005 मध्ये मी शिवसेनेतून बाहेर गेलो. काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचाराने काम करण्यात अडचण येत होती, ती अडचण आता आम्ही दूर केली आहे. 


उमेदवारीची अपेक्षा होती, पण...


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मला लोकसभा निवडणूक लढवायची होती, पण लोकांनी दगाबाजी केली. जानेवारी महिन्यामध्ये एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती, तेव्हापासून आमची चर्चा सुरु होती. शिंदे साहेबांनी सांगितलं की, उमेदवार ठरवला आहे, पण तुम्ही आमच्यासोबत काम करा. शिवसेना आणि शिंदेना साथ देण्याचा देवाचा आदेश असल्याने आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. उमेदवारीची अपेक्षा होती, पण ती आता बाजूला सारत शिंदे आणि महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार असल्याचं निरुपम यांनी सांगितलं आहे.