Maharashtra Politics Annasaheb Dange: सांगली जिल्ह्यातील जेष्ठ नेते आणि धनगर समाजाचे जेष्ठ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये जात आहेत. पुढील आठवड्यात मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, त्यांचे दोन सुपुत्र चिमण डांगे, विश्वनाथ डांगे भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अण्णासाहेब डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्याच्याशी सविस्तर चर्चा केली होती. आता अण्णासाहेब डांगे यांच्या पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे. राज्यामध्ये पहिल्यांदा काँग्रेसला (Congress) सत्तेपासून रोखण्यात अण्णासाहेब डांगे (Annasaheb Dange) यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुशीत अण्णासाहेब डांगे यांचे नेतृत्व तयार झालेले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
अण्णासाहेब डांगे यांचे नेतृत्व सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पुढे आले. त्यानंतर त्यांनी भाजपमधून मंत्रिपद आणि विविध पदे भूषवली. त्याकाळी राज्याच्या राजकारणात अण्णासाहेब डांगे यांचा दबदबा होता. अण्णासाहेब डांगे यांनी आतापर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणासहित अनेक प्रश्नावर आवाज उठवला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणातील धनगर आणि धनगड हा शब्दाचा तिढा सोडवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक प्रयत्न केलेत.
राज्यात 1995 मध्ये युती शासन सत्तेवर येताच त्यांना ग्रामीण विकास खात्याचे मंत्रिपद दिले गेले होते. डांगेचे सांगलीचे पालकमंत्री असतानाच्या कारकीर्दीतच सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहराची संयुक्त महापालिका अस्तित्वात आली. राज्यात महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळात जयंत पाटील होते. त्यावेळी जयंत पाटील व शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे पुत्र चिमण डांगे, विश्वास डांगे यांनी जयंत पाटील यांचे नेतृत्व स्वीकारले होते. परंतु राष्ट्रवादीत अण्णासाहेब डांगे फ़ार काही सक्रिय राहिलेले दिसले नाहीत. या दरम्यानच्या काळात भाजपशी त्यांचे सलोख्याचे संबंध कायम होते. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचे नेतृत्व व अन्यत्र भाजप नेत्यांशी सलगी त्यांनी ठेवली होती. राष्ट्रवादी फुटल्यानंतर अण्णासाहेब डांगे भाजपकडे जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
आणखी वाचा