मुंबई : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या घटनेचे थरकाप उडवणारे फोटो व्हायरल झाले आहेत. संतोष देशमुख यांना अंतर्वस्त्रावर बसवून आरोपींनी राक्षसी वृत्तीने मारहाण केल्याचे फोटो माध्यमातून समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर, राजकीय दबाव वाढताच मंत्री धनंजय मुंडेंनी (dhananjay munde) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही राज्यभरातून तीव्र भावना व्यक्त होत असून गेल्या अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा घ्यायला हवा होता, असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. तर, मंत्री पकंजा मुंडेंनीही राजीनाम्यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, धनंजयला मंत्रिपदच द्यायला नव्हते पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. आता, स्वराज्य पक्षाचे संस्थापक व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर परखड भूमिका मांडली. तसेच, मंत्रिपदाचे कवच घालून तुम्ही आरोपपत्र दाखल करण्याची वाट पाहात होता का, असा सवालही संभाजीराजेंनी विचारला आहे.  

Continues below advertisement

संतोष देशमुख यांच्या हत्येचे निर्दयी, क्रूर फोटो समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे. माझ्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरुन आणि वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, नैतिकतेच्या मुद्द्यावरच त्यांचा राजीनामा घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने परिपत्रकातून स्पष्ट केलं आहे. आता, मुंडेंच्या राजीनाम्यावर संभाजीराजेंनी देखील तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे. या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहिरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रीपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती. मात्र लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले. राजीनाम्याच्या मागणीकडेही अडीच महिने दुर्लक्ष केले गेले. किंचितही नैतिकता असती तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता. मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का ? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे !'', असे संभाजीराजेंनी म्हटले. 

एखाद्या राजीनाम्याने विषय संपणार नाही - थोरात

स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली होती, कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे ते फोटो आहेत. 80 दिवस हे पुरावे सरकारकडे असूनही सरकारने काहीच केले नाही. सरकारने निगरगठ्ठपणा आणि निर्लज्जपणाचा कळस गाठला. महाराष्ट्र हा न्याय, नीती आणि सुसंस्कृतपणासाठी ओळखला जातो. मात्र, संतोष देशमुख हत्याकांड आणि त्यानंतर सरकारचे वागणे ह्या दोन्हीही घटनांनी महाराष्ट्राला सुन्न करून टाकले आहे. फोटो समोर आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र ठामपणे उभा आहे. निदान थोडी संवेदना आणि माणुसकी शिल्लक असेल तर सरकारने या हत्याकांडातील सर्व सूत्रधारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी. एखाद्या राजीनाम्याने विषय संपणार नाही, न्यायासाठी लढत राहू, असे काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

हेही वाचा

धनंजय मुंडेंचा हत्याप्रकरणाशी संबंध नाही, नैतिकतेतून राजीनामा, राष्ट्रवादीकडून पत्रक जारी!