मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी आज अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh case) हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, संतापाची लाट उसळली. त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती, आज अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर आता विरोधक देखील आक्रमक झाल्याचं चित्र आहे. भाजप,राष्ट्रवादीसह आता शिवसेना देखील आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आता वाल्मिक कराड या क्रूरकर्माला आता फासावरच लटकवा अशी मागणी केली आहे.

Continues below advertisement

काय म्हणालेत नरेश म्हस्के

शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या सोशल मिडिया एक्सवरती याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टॅग करून पोस्ट लिहली आहे, पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, "मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात वाल्मिक कराड या क्रूरकर्माला आता फासावरच लटकवा. एकेकाळी पाणक्या म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक कराडने आणि त्याच्या साथीदारांनी बीडमध्ये गुंडगिरीचा उच्चांक गाठला आणि आपल्या दुष्कृत्यांमुळे हा माणूस आज सगळ्यांना डोईजड झाला आहे. सामान्य लोकांबरोबरच तिकडच्या ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवक यांनाही त्याने देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. माणुसकीला काळीमा फासणारे असुरी कृत्य त्याने केले आहे.महाराष्ट्र सरकारने अशा वर्तमानकालीन क्रूरकर्मा औरंग्याला आणि त्याच्या साथीदारांना, फास्ट ट्रॅकवर  हा खटला चालवून फासावरच लटकवलं पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे.सामान्य माणसासाठी  शिवसेना कायम कटिबद्ध आहे. या प्रकरणी आज शिवसेनेतर्फे आम्ही आंदोलन उभारणार असून आमचा निषेध सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत," असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

राजीनाम्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया 

राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे."