Dhananjay Munde Resignation मुंबई: संतोष देशमुख हत्याप्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी आज (4 मार्च) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनंजय मुंडेंना कार्यमुक्त केल्याची घोषणा करण्यात आली. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Dhananjay Munde Latest Marathi News)
धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला; आता पुढे काय?
धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचं आता पुढे काय होणार?, अशी चर्चा रंगली आहे. तसेच धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार का?, असा सवालही उपस्थित केला जातोय. मात्र धनंजय मुंडेंची आमदराकी सध्यातरी रद्द होणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना तूर्त सहआरोपी केले जाणार नाही, अशी खात्रीलायक सूत्रांची ‘माझा’ला माहिती आहे. चार्जशीटमध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाही. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही कुठलीही कार्यवाही नाही. राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष असणार आहे. धनंजय मुंडे मंत्रिपदावर राहिल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही, असा आरोप विरोधकांकडून सतत करण्यात येत होता.
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय देशमुख एक्सवर पोस्ट करत म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर-
वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जात होता. धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर होती, असे सांगितले जाते. वाल्मिक कराड याने आवादा या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यावरुन कंपनी प्रशासन आणि वाल्मिक कराड यांच्यात वाद होते. या वादातून वाल्मिक कराडचे सहकारी आवादा कंपनीत गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. हा सुरक्षारक्षक मस्साजोग गावातील असल्याने सरपंच संतोष देशमुख आवादा कंपनीत गेले होते. त्याठिकाणी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी वाल्मिक कराडच्या टोळीच्या लोकांना मारहाण केली होती. 6 डिसेंबर 2024 रोजी हा वाद झाला होता. त्यानंतर या भांडणाचा डुख मनात ठेवून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली होती.