Saamana Editorial on Nitesh Rane : आयडी कार्ड पाहून फक्त हिंदूंना दांडिया, गरबा (Garba Dandiya 2023) खेळण्यासाठी प्रवेश देण्याची मागणी करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंवर (BJP MLA Nitesh Rane) सामनातून (Saamana Editorial) जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. बाटग्यांचे 'लव्ह जिहाद' राष्ट्रीय एकात्मतेला तडे देत असल्याची टीका सामनात करण्यात आली आहे. तसेच, गरब्यात इतर धर्मीयांना प्रवेश दिल्याने 'लव्ह जिहाद'सारखे प्रकार वाढतील असा प्रचार करणे म्हणजे हिंदू धर्माला कमी आणि कमजोर लेखण्यासारखं असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. तसेच, धर्म सोडून बसलेले लोक धर्माचे रक्षक बनतात तेव्हा धर्म जास्त संकटात येतो. या अशा बाटग्यांमुळेच देश आणि हिंदुत्वास धोका निर्माण होतो, असं म्हणत नितेश राणेंना सामनातून सणसणीत टोला लगावला आहे.
सामना अग्रलेखात म्हटलंय की, "गरब्यात इतर धर्मीयांना प्रवेश दिल्याने 'लव्ह जिहाद'सारखे प्रकार वाढतील असा प्रचार करणे म्हणजे हिंदू धर्माला कमी आणि कमजोर लेखण्यासारखे आहे. गरब्यात हिंदूंनाच प्रवेश, मुसलमान नकोत, हे धोरण राबविणाऱ्या बाटग्यांनी लडाखमध्ये 'चिनी' नकोत, त्यांना हाकला, अशी भूमिका घेतल्याचे दिसत नाही, पण मुंबईत गरबा कोणी आणि कसा खेळावा यावर हे बाटगे हिंदुत्ववादी बंधने घालीत आहेत. धर्म सोडून बसलेले लोक धर्माचे रक्षक बनतात तेव्हा धर्म जास्त संकटात येतो. या अशा बाटग्यांमुळेच देश आणि हिंदुत्वास धोका निर्माण होतो. बाटग्यांचे 'लव्ह जिहाद' राष्ट्रीय एकात्मतेस तडे देत आहे."
काही बाटगे हे खऱ्या मुसलमानांपेक्षा जोरात बांग देतात : सामना
"काही बाटगे हे खऱ्या मुसलमानांपेक्षा जोरात बांग देतात. भाजपमध्ये शिरलेल्या नकली हिंदुत्ववाद्यांचेही तसेच आहे. कालपर्यंत जे हिंदुत्वास लाथा घालत होते, ते आता भाजपच्या तंबूत शिरून हिंदुत्वाच्या घंटा जोरात बडवू लागले आहेत. यावेळी गरब्याच्या कार्यक्रमात फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याची भूमिका भाजपमधील बाटग्यांनी घेतली. गरबा उत्सवात आयोजकांनी आधारकार्ड वगैरे तपासून केवळ हिंदूंनाच प्रवेश मिळावा असे या मंडळींनी जाहीर केले. मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गरब्याचे आयोजन होते आणि केंद्रात मोदी-शहांच्या राजकीय टिपऱ्या घुमायला लागल्यापासून मुंबईतील गरब्यास जरा जास्तच जोर चढला आहे. हिंदुत्वात भेसळ झाली की, मेंदूत बिघाड होतो. कुठेही, कसेही मारून मुटकून हिंदुत्व घुसवायचे असे सध्या चालले आहे.", असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
नवरात्रीच्या उत्सवाशी सध्याच्या राजकीय गरब्याचा काही संबंध आहे काय? सामनातून प्रश्न उपस्थित
"ज्यांना गरबा खेळायचा असेल त्यांनी 'घर वापसी' करून हिंदू धर्मात प्रवेश करावा अशी अट हिंदू बाटग्यांनी घातली. भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाच्या बाबतीत जो वैचारिक गोंधळ उडाला आहे, त्याचाच हा नमुना आहे. नवरात्रीच्या उत्सवाशी सध्याच्या राजकीय गरब्याचा काही संबंध आहे काय? हा संशोधनाचा विषय आहे. प. बंगालात नऊ दिवस, नऊ रात्री दुर्गेचा उत्सव होतो आणि खऱ्या अर्थाने नवरात्रीचा जागर घडतो. अशा दुर्गापूजा राजकीय गरबाप्रेमींच्या आलिशान मांडवात होताना दिसत नाहीत. नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस, अशी उपासना देशभरात होत असते. दुर्गापूजा हा नेहमीच हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे. देवी दुर्गेचा सन्मान करणारा हिंदू सण म्हणजे नवरात्र. दुर्गेचे आहेत आणि हिंदू धर्माची हीच विशालता आहे. नवरात्रीचे जागरण व आज ज्या पद्धतीचा राजकीय धांगडधिंगाछाप गरबा होतो त्यात फरक आहे.", असं अग्रलेखात म्हटलं आहे.
गरब्यात हिंदूंनाच प्रवेशाची जी टूम काढून बाटगे स्वतःचं ज्ञान पाजळतायत, ते हिंदुत्वाची व्याख्या आणि धार बोथट करतायत : सामना अग्रलेख
सामना अग्रलेखात पुढे म्हटलंय की, "गरब्यातून हिंदू संस्कार हरवला आहे. दुर्गापूजेचे खरे स्वरूप पाहायचे असेल तर ते प. बंगालात दिसते. आजचा गरबा हा 'मारू मुलुंड' किंवा 'मारू घाटकोपर' असा वाद करणाऱ्यांचा आहे आणि अशा गरब्यातच 'आधारकार्ड' तपासून प्रवेश देण्याचा खेळ होऊ शकतो. हिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव हे राष्ट्रीय एकात्मतेस महत्त्व देणारे आहेत आणि ते तसेच असायला हवेत. गरब्याच्या मांडवात आता व्यापारीकरण झाले. तिथे कोट्यवधी रुपयांची उधळण होते, नट-नट्यांचा झगमगाट होतो आणि 'मारू घाटकोपर वाल्यांचे नेते व्यासपीठावर ठाण मांडतात. यात दुर्गापूजेचे मांगल्य कोठे आहे? गरब्यात हिंदूंनाच प्रवेश ही जी टूम काढून बाटगे स्वतःचे ज्ञान पाजळत आहेत ते हिंदुत्वाची व्याख्या व धार बोथट करीत आहेत. फक्त हिंदूंनाच प्रवेश हेच धोरण राबवायचे म्हटले तर सगळ्यात जास्त पंचाईत पंतप्रधान म्हणून मोदींचीच होईल. चारच दिवसांपूर्वी टांझानिया देशाच्या राष्ट्राध्यक्ष सामिआ सुलुआ हसन भारत भेटीवर आल्या. पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या सन्मानार्थ हैदराबाद हाऊस येथे मेजवानी, संगीत असा जंगी कार्यक्रम ठेवला. सांगायचे इतकेच, मुसलमान कुठेच नकोत हे भाजपचे हिंदुत्ववादी धोरण असेल तर मोदी इस्लामी राष्ट्रांच्या प्रमुखांचे स्वागत आपल्याकडे करणार नाहीत आणि मोदीही इस्लामी राष्ट्रांत पाय ठेवणार नाहीत."