Saamana Editorial On Andheri Bypoll : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) भाजपने (BJP) माघार घेतली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानंतर भाजपने मुरजी पटेल (Murji Patel) यांची उमेदवारी मागे घेतली. परंतु या सर्व घटनाक्रमावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. "अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या 'मशाली'चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुश्मनांना बसला आहे. पुढे पुढे पाहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहेत. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील," असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.


'शिवसेनेची 'भडकलेली मशाल' बेईमानीचे इमले जाळून टाकेल'
अंधेरीचा पहिला चटका...मशाल पेटली! या मथळ्याअंतर्गत प्रकाशित झालेल्या सामनाच्या अग्रलेखात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांवर सडकून टीका करण्यात आली आहे. "आधी एक ना अनेक कारस्थाने आणि नंतर बराच ऊहापोह केल्यावर भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी श्री. शरद पवारांपासून राज ठाकरे यांनी फडणवीसांना विनम्र आवाहन केले व शेवटी भाजप नेत्यांनी म्हणे दिल्लीशी चर्चा करुन अंधेरीतील उमेदवार मागे घेतला. अर्थात भाजपचे माघारी नाट्य हे दिसते तसे सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही 'भडकलेली मशाल' बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो," असं अग्रलेखात पुढे लिहिलं आहे.


"मशालीचे चटके बसल्याने कुस्ती न खेळताच मैदान सोडले"
निवडणुकीतून माघार घेतल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भाजपचे आभार मानतानाच जहरी टीका देखील केली आहे. "शिवसेना हा अस्सल मराठीं बाण्याचा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि हिंदुत्वात पवित्र अग्निदेवतेचे विशेष स्थान आहे. यज्ञ, होमकुंडातील धगधगत्या अग्नीत समिधांची आहुती देऊन धर्मावरील, समाजावरील संकट दूर केले जाते. अंधेरीत तेच घडले. शिवसेनेच्या विजयी मशालीने या पोटनिवडणुकीतील संकटे व अमंगलाचा नाश केला. भाजप… कारस्थानी आनंदीबाई… माफ करा, कमळाबाईंनी बेइमान 'मिंधे' गटास हाताशी पकडून जो घाव शिवसेनेवर, पर्यायाने महाराष्ट्रावर घातला, त्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नियतीनेच जणू अंधेरी पोटनिवडणुकीचे प्रयोजन केले होते. आधी ऐटीत बेटकुळ्या फुगवून शड्डू ठोकणाऱ्यांना कुस्तीआधीच मशालीची धग आणि चटके बसले व त्यांनी कुस्ती न खेळताच मैदान सोडले. अब्रू वाचावी म्हणून 'झाकली मूठ…' बंदच ठेवण्याचा भाजपायी मंडळींचा माघारीचा निर्णय हा महाराष्ट्रात एका त्वेषाने पेटलेल्या शिवसेनेच्या ज्वालाग्राही मशालीचा पहिला विजय आहे."


"लटके प्रकरणात 'मिंधे' सरकारच्या कारस्थानाचे वाभाडेच काढले"
दरम्यान ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन झालेल्या वादावरही सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. "ऋतुजा लटके यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी भाजप व मिंधे गटाची अभद्र हातमिळवणी झाली.  मुंबई महापालिकेत नोकरी करणाऱ्या श्रीमती लटके यांचा नोकरीचा राजीनामा स्वीकारला जाऊ नये व त्यांना निवडणूक लढवता येऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणे जिवाची बाजी लावली. ''श्रीमती लटके यांचा राजीनामा मंजूर कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. ईडी-सीबीआय मागे लावू,'' अशा अप्रत्यक्ष धमक्या देण्यात आल्याचेही मुंबई महापालिकेच्या प्रशासनात कुजबुजले गेले. खरेखोटे 'ईडी' सरकारलाच माहीत. शेवटी हे सर्व प्रकरण हायकोर्टात गेले व हायकोर्टाने याप्रकरणी सरकारच्या दाढीची खुंटे उपटली तेव्हा कोठे सगळे सुरळीत झाले. फडणवीस-मिंधे सरकारला डोळय़ासमोर पराभव स्वच्छ दिसल्यानंतर आता जे माघारीचे शहाणपण सुचले ते आधीच सुचले असते तर आज जी तोंड लपवायची वेळ आली ती आली नसती. आपला पती गमावलेल्या दुःखी महिलेच्या बाबतीत इतक्या खालच्या थरास आधीच जायला नको होते. भ्रष्टाचाराच्या तक्रारी, खटला असलेले अनेक 'मिंधे' फडणवीसांच्या सरकारात मंत्री म्हणून चरत व मिरवत आहेत. त्यांना काही अडथळे आले नाहीत. अनेकांवरचे भ्रष्टाचाराचे खटले घाईघाईने काढून घेऊन त्यांना 'शुद्ध' करून घेतले गेले; पण महापालिकेतील एका लिपिकेस बनावट तक्रारीच्या आधारे नाहक त्रास दिला. त्या त्रासातून अखेर मुंबईच्या उच्च न्यायालयास तिची सुटका करावी लागली. न्यायालयाने श्रीमती लटके प्रकरणात 'मिंधे' सरकारच्या कारस्थानाचे वाभाडेच काढले.


"अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या 'मशाली'चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुश्मनांना बसला"
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव देत मशाल चिन्ह दिलं तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देत तलवार-ढाल हे चिन्ह दिलं. नव्या नाव आणि चिन्हासह अंधेरी पोटनिवडणूक ही पहिलीच लढाई होती. आता यातून भाजपने माघार घेतल्याने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या निवडणूक चिन्हाचं महत्त्व सामनाच्या अग्रलेखात अधोरेखित करण्यात आलं आहे. "मशालीचे पावित्र्य आणि महत्त्व इतिहासकाळापासून आहे. दुश्मनांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी इतिहासकाळात मशालींचा वापर झाला होता. शिवरायांचे मावळे रात्री-अपरात्री हाती मशाली आणि दिवटय़ा घेऊनच गनिमी काव्याने दुष्मनांवर हल्ले करीत असत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योद्ध्याच्या हातातही मशाल होती. मशाल म्हणजे न विझणारी, प्रेरणा देणारी धगधगती ऊर्जा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मारकावरही मशाल अखंड धगधगत आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या 'मशाली'चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुश्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुश्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील! पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल! मशालीच्या अग्निप्रकाशात भविष्यातील शिवसेनेचे तमाम विजयमार्ग आम्हाला स्पष्ट दिसत आहेत!"