अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी तीन नावांची लवकरच शिफारस केली जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) आणि आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची नावे दिली जाण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 
दरम्यान,  रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना विधानपरिषदेवर संधी मिळणार असल्याच्या चर्चेवर आता त्यांच्याच पक्षातील रूपाली ठोंबरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल रूपाली ठोंबरे (Rupali Patil) यांनी उपस्थित केला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आता पक्षातील रोष आणि असंतोष वाढताना दिसतोय. राज्यपाल नियुक्त जागांवर पक्षाकडून कळवल्या जाणाऱ्या तीन नावांत रूपाली चाकणकरांच्या नावाला पक्षातच विरोध होत असल्याचे पुढे आले होते. अशातच, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांनी विरोधात भूमिका मांडली होती त्या पाठोपाठ आता पक्षाच्या जेष्ठ नेत्या वैशाली नागवडे यांनीही चाकणकर यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे. 'एबीपी माझा'शी बोलत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


राष्ट्रवादी पक्षात इतरही अनेक कर्तृत्वान महिला आहेत, त्यांना संधी द्या


राष्ट्रवादी पक्षात काम करणाऱ्या  इतरही अनेक कर्तृत्वान महिला असल्याचं मत पक्षाच्या जेष्ठ नेत्या वैशाली नागवडे यांनी व्यक्त केलं आहे. नागवडे या महानंद दुध संघाच्या माजी अध्यक्षा असून त्यांच्या भूमिकेनंतर पक्षाच्या जेष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे यांचाही चाकणकर यांच्या नावाला विरोध आहे. इतर कोणत्याही महिला पदाधिकारीला संधी द्यावी, असं ठाकरे यांचं मत आहे. रूपाली ठोंबरे यांची मत व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असली तरी त्यांच्या भावना खऱ्या आहेत. सुरेखा ठाकरे या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा आणि अमरावती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पहिले आहे. दरम्यान त्यांनी देखील या निर्णयाला आपला विरोध दर्शवला आहे.    


चाकणकरांच्या नावाला पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीचाही विरोध होत आहे. पक्षाच्या चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची पक्षानं एक व्यक्ती, एक पद' तत्वाचा अंगीकार करावा, अशी मागणीही केली आहे. पक्षाकडे पाटील यांना विधानपरिषदेवर घेण्याची चित्रपट आणि कला क्षेत्रातील अनेकांनी मागणी केली होती.


तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात...


दुसरीकडे याच विषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केलंय. या संदर्भातली कुठली चर्चा महायुतीमध्ये झालेले नाही. पक्षामध्ये सुद्धा यासंदर्भात बोलणे झालेल नसल्याचे सुनील तटकरे म्हणाले. किमान 50 ते 55 सहकाऱ्यांनी विधान परिषदेची जागा मिळावी, यासाठी अर्ज केलेला आहे. ज्यावेळेस निश्चिती होईल तेव्हा पक्षाचा संसदीय मंडळ या संदर्भातला निश्चित विचार करेल, असे म्हणत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणात आपली स्पष्टोक्ती दिली आहे. 


हे ही वाचा