मुंबई: उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी रवींद्र वायकर यांनी रविवारी वर्षा बंगल्यावरील सोहळ्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी ठाकरे गटाचा आणखी एक महत्त्वाचा नेता गळाला लागल्यामुळे शिंदे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये विजयाची भावना होती. ठाकरेंची साथ सोडून महायुतीत सामील होणाऱ्या प्रत्येक नेत्याचा पक्षप्रवेशाचा सोहळा शिंदे गटाकडून दणक्यात साजरा केला जात आहे. साहजिकच या सर्व पक्षप्रवेश सोहळ्यांची राजकीय वर्तुळात बऱ्यापैकी चर्चा होते. परंतु, रविवारी पार पडलेला रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा याला अपवाद ठरला, असे म्हणावे लागेल. कारण वायकरांच्या शिंदे गटातील (Shinde Camp) पक्षप्रवेशापेक्षा कार्यक्रमातील त्यांच्या बॉडी-लँग्वेजचीच जास्त चर्चा झाली. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून येणे ही तशी अशक्य कोटीतील बाब मानली जात होती. परंतु, ईडीच्या धाकाने ही गोष्ट अखेर साध्य झाली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रवींद्र वायकर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ज्याप्रकारे वावरत होते, त्यावरुन याचा पुरेपूर प्रत्यय येत होता. रवींद्र वायकर शिंदे गटात स्वत:हून आले नाही तर त्यांना अदृश्य शक्तीच्या धाकाने नाईलाजाने ठाकरेंची साथ सोडावी लागली, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे.


पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात नेमकं काय घडलं?


रवींद्र वायकर यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम वर्षा बंगल्यावर पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: उपस्थित होते. या कार्यक्रमाला रवींद्र  वायकर यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुली आणि जावई असे सर्वजण उपस्थित होते. परंतु, पक्षप्रवेश सोहळ्यात रवींद्र वायकर यांची देहबोली वेगळेच सांगत होती. रवींद्र वायकर हे अत्यंत धीरगंभीर दिसत होते तर त्यांच्या पत्नीचा चेहराही उतरला होता. रवींद्र वायकरांचे हारतुरे घालून स्वागत करण्यात आले तेव्हा ते उसनं अवसान आणून कसेनुसे हसण्याचा प्रयत्न करत होते, असे तेथे उपस्थित असलेल्यांचे म्हणणे होते. आपण एका नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहोत किंवा सत्ताधारी गटात सामील झालो आहोत, आपला पक्षप्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे, यापैकी एकाही गोष्टीचा उत्साह रवींद्र वायकर यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यामुळे रवींद्र वायकर यांची पक्षप्रवेश सोहळ्यातील बॉडी-लँग्वेज राजकीय वर्तुळासोबत सामान्य नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरली. 


जीवाभावाच्या सहकाऱ्यांची साथ सोडण्यापूर्वी रवींद्र वायकर गणपतीच्या दर्शनाला, उद्धव ठाकरेंचा विषय निघताच डोळे पाणावले


उद्धव ठाकरेंचा विषय निघाला अन् रवींद्र वायकरांचे डोळे पाणावले


शिंदे गटातील पक्षप्रवेश सोहळ्यासाठी वर्षा बंगल्यावर रवाना होण्यापूर्वी रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी क्लब हाऊसमध्ये जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळीही रवींद्र वायकर यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. कार्यकर्त्यांची भेट घेऊन बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे हे काल तुमच्या मतदारसंघात आले होते. तेव्हा तुम्ही त्यांचं स्वागत केलं. तुमचे इतक्या वर्षांचे ऋणानुबंध आहेत, असा प्रश्न यावेळी रवींद्र वायकर यांना विचारण्यात आला. त्यावेळी गाडीत बसून निघण्याच्या घाईत असलेल्या रवींद्र वायकर यांचा पाय अडखळला. त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आले तेव्हा मी त्यांचं स्वागत केले. ते आले की मी स्वागत करणारच ना. हे शब्द बोलताना रवींद्र वायकर यांचा कंठ दाटून आला होता. त्यांचे डोळेही थोडेफार पाणावले होते. यानंतर रवींद्र वायकर  फार काही न बोलता वर्षा बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. 


आणखी वाचा


उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार