मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री रविंद्र वायकर यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करुन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांचा प्रवेश हा दबावतंत्राने झाल्याची चर्चा राजकीय (Politics) वर्तुळात रंगली होती. विशेष म्हणजे रविंद्र वायकर यांनीही काही दिवसांपूर्वी थेट भाष्य करत मनातील खदखद बोलून दाखवली होती. विशेष म्हणजे रवींद्र वायकर (Ravindra waikar) यांना एकनाथ शिंदे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, अशा गरमागरमीच्या काळात वायकर यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकर यांना गद्दार म्हणत त्यांची उमेदवारी कुठलंही चॅलेंज नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय. 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून यापूर्वीच गजानन किर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तिकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, आता ठाकरेंनी रवींद्र वायकर हे गद्दार असून त्यांचं आव्हान वाटत नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेच्या अमोल किर्तीकरांना रवींद्र वायकर यांचे आव्हान नाही, ते गद्दार आहेत. त्यांनी एकप्रकारे भ्रष्टाचाराची कबुली दिली आहे, त्यांच्यापुढे दोनच पर्याय होते. पण, अमोल घाबरला नाही, अमोल ताठ मानेने उभा राहिला. येथील मतदार शिवसेनेशी एकनिष्ठ आहे, त्यांना या गद्दारांविषयी राग असून लोकांना लढणारा माणूस आवडतो, असे म्हणत अमोल किर्तीकर यांच्या पाठिशी मुंबईतील जनता असल्याचंही ठाकरेंनी बोलून दाखवलं. निवडणूक काळात जो कारवाईचा फास दिसून येत आहे, तो फास केवळ 4 जूनपर्यंत राहिल. कारण, हा फास तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.


रवींद्र वायकरांची हतबलता


जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला, असं म्हणणारे रवींद्र वायकर ठाकरेंना छुपी मदत करतील, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण शिंदे गटात प्रवेश करतानाही रवींद्र वायकर यांचा चेहरा पडलेलाच दिसत होता. त्यामुळे शिंदे गटातून निवडणूक लढताना वायकर जोर लावणार की, छुपी मदत करणार ? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यातच, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या विधानामुळेही त्यांची हतबलता आणि मनातील खदखद जनतेसमोर आली आहे. 



ठाकरेंचा जेपी नड्डांवर पलटवार


उद्धव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विधानावर पलटवार केला आहे. भाजप जिंकणार तर नाही. भाजप जिंकल्यास भाजपकडून संघावर बंदी आणली जाऊ शकेल, नरेंद्र मोदीच संघावर बंदी आणतील, असे ठाकरेंनी म्हटले आहे. आजपर्यंत वल्लभाई पटेल यांच्यानंतर भाजप व नरेंद्र मोदी हेच संघावर बंदी आणतील, वल्लभभाईंनी केलं तेच मोदी करतील, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 


काय म्हणाले होते जेपी नड्डा


दरम्यान, अलटबिहारी वाजपेयींच्या काळात भाजप पक्षाला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती. कारण, भाजप तेव्हा छोटा व मर्यादीत पक्ष होता.  मात्र, आता आम्ही सक्षम बनलो आहोत, आमचा पक्ष मोठा झाला आहे, भाजप आता स्वत:चं पक्ष चालवत आहे, असे जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे.