रत्नागिरी: रत्नागिरी-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याविरोधात उमेदवार कोण? याचा शोध सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतला जात आहे. याबाबत आज रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होणार आहे. विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत उमेवारीबाबत चर्चा होणार आहे. सामंत यांच्याविरोधात दिला जाणारा उमेदवार हा पक्षातील आणि निष्ठावंत असावा असा सूर सध्या स्थानिक पातळीवर आहे. याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. तसेच इतर पक्षातील उमेदवार दाखल झाल्यास त्याला मिळणारी मदत कशी असेल? त्यावर स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं म्हणणं काय? यावर देखील या बैठकीत ऊहापोह होणार आहे. त्यामुळे आजची बैठक ही महत्त्वाची आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिघेजण इच्छुक होते. पण, एका इच्छुकानं आता माघार घेतली आहे. त्यामुळे आणखी दोन जण या स्पर्धेत अद्यापही कायम आहेत. 


बाळ माने यांच्या नावाची चर्चा


सामंत यांच्याविरोधात सक्षम उमेदवार म्हणून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्या नावाची चर्चा आहे. तगडा चेहरा म्हणून बाळ माने यांना उद्धव ठाकरे रिंगणार उतरवणार असल्याचं स्थानिक पातळीवर बोललं जात आहे. तशा बैठका देखील वरिष्ठ पातळीवर झाल्याची चर्चा रत्नागिरीतील राजकारणात आहे. पण, अद्याप तरी पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित नाही. बाळ माने हे शिवसेना - भाजप युतीचे आमदार राहिले आहेत. पण, 2004 मध्ये उदय सामंत यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर या मतदारसंघाचे सामंत हेच आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत. 


मानेंना शिवसैनिक स्वीकारणार? 


अर्थात इतर पक्षातील उमेदवार दिल्यास शिवसैनिकांची प्रतिक्रिया काय असणार? यावर सध्या खल सुरू आहे. बाळ माने ठाकरेंच्या शिवसेनेत आल्यास त्यांना ठाकरेंचे शिवसैनिक स्वीकारणार का? त्यांचा प्रचार करणार का? त्यांना माने यांचा प्रवेश मान्य आहे का? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.


शेकापमधील वाद पुन्‍हा एकदा चव्‍हाटयावर  


शेतकरी कामगार पक्षात पाटील कुटुंबियांतील पेझारी विरूदध अलिबाग हा वाद आता लपून राहिलेला नाही. त्‍याची प्रचिती सध्‍या येत आहे. रायगड जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या महिला बचत गट फेडरेशन आयोजीत महिला संवाद मेळावा अलिबाग मधील पेझारी येथे पार पडला. यानिमित्‍ताने शेकापमधील विसंवाद थेटपणे समोर आला. 


या मेळाव्‍याचे नेतृत्‍व शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांच्‍या स्नुशा चित्रलेखा पाटील यांनी केले. मात्र, या मेळाव्‍याला माजी आमदार पंडित पाटील यांच्‍या पत्‍नी भावना पाटील  उपस्थित नसल्याने पाटील कुटुंबात सार काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. उलट आपल्‍याला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं नसल्याची खंत सुध्दा जिल्‍हा परीषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी व्यक्त केली. आमच्‍या कुटुंबातील तिघींना न बोलावल्‍याने आमच्‍या तीन साडया कमी झाल्‍या, असा टोला पंडित पाटील यांचे पुत्र सवाई पाटील यांनी लगावला आहे. यावरून पाटिल कुटुंबात आता नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा


निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले, त्यांच्या पाठिशी शिवसेनेची संपूर्ण ताकद लावू