मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. नारायण राणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावरील भेटीनं चर्चाना उधाण आले हे. तर निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी (Uday Samant) दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतं. त्यामुळे आता इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी सर्व जोर पणाला लावलाय. यामध्ये आता नारायण राणेंनीही एन्ट्री घेतलीय. माजी खासदार निलेश राणे यंदा कुडाळ मालवणमधून आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली. या भेटीनंतर शिंदेंनी तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चेसाठी तात्काळ उदय सामंतांना वर्षावर बोलावल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री आणि नारायण राणेंमध्ये प्रवेशासंदर्भात चर्चा
कुडाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत उमेदवाराची आदला-बदल होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर निलेश राणे यांच्यासाठी भाजपाचा दावा आहे. मात्र जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत निलेश राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची आणि हा तोडगा निघाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
कोकणातील शिवसेनेची ताकद पूर्णपणे त्यांच्या पाठीशी : उदय सामंत
याविषयी बोलताना उदय सामंत म्हणाले, निलेश राणे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहे. विधानसभेला ते उभे राहणार आहेत एवढचं मला माहीत आहे. पण निलेश राणे यांनी जर निर्णय घेतला तर आमची कोकणातील शिवसेनेची ताकद पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असेल. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हांला मान्य असेल.
निलेश राणे हे माजी खासदार आहेत. 2009 मध्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. पण, 2014 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्याशी त्यांची 2014 मध्ये लढत झाली होती.
हे ही वाचा :
मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक; निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता