शिमला : हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh politics) नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर विधानसभा अध्यक्षांनी (Congress) मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधात जाऊन राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 6 आमदारांना अध्यक्षांनी अपात्र घोषित केलं आहे. व्हिपचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली. हिमाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया (Himachal Pradesh Assembly Speaker Kuldeep Singh Pathania ) यांनी ही कारवाई केली.
पक्षांतर बंदी कायद्यानुसार 6 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी सांगितलं. कुलदीप सिंह पठानिया म्हणाले, 6 आमदारांविरुद्ध तक्रार मंत्री हर्ष वर्धन यांनी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ही कारवाई केली.
या आमदारांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढली होती, मात्र त्यांनी पक्षाचा व्हिप पाळला नाही. त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं. दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून मी ही कारवाई केली, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.
कोणकोणते आमदार निलंबित?
काँग्रेसच्या याचिकेनंतर विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र केले आहे. यामध्ये धर्मशालाचे आमदार सुधीर शर्मा (Sudhir Sharma), सुजानपूरचे आमदार राजेंद्र राणा (Rajendra Rana) , कुटलैहडचे आमदार देवेंद्र भुट्टो (Devendra Bhutto), गगरेटचे आमदार विधायक चैतन्य शर्मा (Chaitanya Sharma), लाहौल स्पीतीचे आमदार रवी ठाकूर (Ravi Thakur) आणि बडसरचे आमदार इंद्र दत्त लखनपाल (Inder Dutt Lakhanpal) यांचा समावेश आहे.
राज्यसभा निवडणुकीत अभिषेक मनू सिंघवींचा पराभव
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे. मात्र तरीही राज्यसभा निवडणुकीत सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांना पराभवाचा धक्का बसला. त्या ठिकाणी भाजपच्या हर्ष महाजन यांनी बाजी मारली. दोन्ही उमेदवारांना समसमान मतं म्हणजे प्रत्येकी 34 मतं मिळाल्यानंतर ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून भाजपचा उमेदवार जिंकला. काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानंतर आता त्या ठिकाणचे सुखविंदर सिंग सुखू यांचे सरकारही अल्पमतात आल्याचं स्पष्ट झालंय.
काँग्रेस सरकार अल्पमतात
सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानंतर हिमाचलमधील काँग्रेस सरकार अल्पमतात आल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला.
मी राजीनामा दिला नाही
दरम्यान,हिमाचलमध्ये काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपकडून केल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त देशभरात पसरलं. त्यावर स्पष्टीकरण देताना आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, हे सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा सुखू यांनी नुकताच केला.
हिमाचलमधील पक्षीय बलाबल
- एकूण संख्या - 68
- काँग्रेस- 40
- भाजप- 25
- अपक्ष - 3
काँग्रेसचे 40 आणि तीन अपक्ष असे मिळून 43 जणांचा पाठिंबा सुखू सरकारला आहे. असं असलं तरीही यातील एकूण 9 आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याने आणि एक मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आता सरकारकडे फक्त 33 आमदार राहिले आहेत. यापैकीही काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला आहे.
ही बातमी वाचा: