रत्नागिरी - सिंधुदुर्ग: कोकणातल्या (Kokan) रत्नागिरी - सिंधुदुर्ग (Ratnagiri- Sindhudurg) या लोकसभेच्या (Lok Sabha Election) जागेवरून आता भाजप आणि शिवसेनेत राजकीय युद्ध आता सुरू झालं आहे. दरम्यान,  रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेत उमेदवार कोण? जागा शिवसेनेला जाणार का? भाजपला? यावरून सुरू झालेल्या वादानं, दाव्या - प्रतिदाव्यानं राजकारण पुरतं ढवळून निघालं आहे. पण, मित्र पक्षांमधील जागेवरची रस्सीखेच अद्यापही थांबलेली नाही.माघारीच्या ट्विटनंतर किरण सामंत यांनी ट्विट डिलीट केले. पण, उलटलुलट चर्चा अद्यापही थांबलेल्या नाहीत. अशावेळी भाजपची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.


जागा कुणाला जाणार हे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेलं नसलं तरी नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांकडून मात्र तयारी जोरात सुरू आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपनं मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली आहे.अगदी महायुतीचा मेळावा देखील झाला.पण, उमेदवार कोण? याचं जाहिरपणे उत्तर मात्र काही मिळत नाही. त्यात ट्विट, मेसेज, सोशल मीडियावर राणे समर्थक, सामंत समर्थक यांच्याकडून व्हारयल होणारे बॅनर यांनी मात्र सर्वसामान्य मतदारांमध्ये एक प्रकारे उमेदवारीवरून संभ्रम आणि उत्सुकता दिसून येतेय 


 रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेची जागा महत्त्वाची का?


मुख्य म्हणजे देशात एक नंबरचा पक्ष असलेल्या भाजपचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे यांच्या रूपानं केवळ एकच लोकप्रतिनिधी आहे. भाजपनं मागील वर्षभराहून अधिक तयारी करत कार्यकर्त्यांची फळी उभारली, नेत्यांच्या वारंवार दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झालाय. त्यामुळे आता लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय पक्षवाढीसाठीची संधी देखील गमावली जाणार आहे.दोन्ही जिल्ह्यांमधील चाकरमानी मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, पुण्यात स्थानिक आहे. या चाकरमान्याची या मोठ्या शहरांमध्ये मतदार म्हणून मोठी भूमिका असते.तर, मुख्यबाब म्हणजे रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभेत उमेवारी मिळाल्यास, तो विजयी झाल्यास आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकच्या जागांवर दावा करणे आणि जास्त लोकप्रतिनिधी निवडून आल्यास शिवसेनेचा पाया मजबूत असलेल्या कोकणात शिवसेनेला राजकीयदृष्ट्या खिळखिळी करणे हे भाजपला साध्य होणार आहे.


भाजपच्या खेळीमुळे शिवसेनेची राजकीय कोंडी


पण, भाजपच्या या खेळीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मात्र पुरती राजकीय कोंडी झाली आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्गची जागा भाजपला सोडल्यास तळकोकणातून शिवसेना पंगू होणे अधिक धोक्याचे आहे. शिवाय, ज्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी साथ दिली आहे त्यांच्यावर अन्याय होऊन काही जण इतर राजकीय मार्ग पत्करण्याचा धोका अधिक आहे. तसेच, मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरांमध्ये कोकणी माणसाची साथ न मिळाल्यास या ठिकाणी देखील शिवसेनेची राजकीय अस्तित्व पणाला लागण्याची शक्यता आहे.तर, मुख्य बाब म्हणजे कोकणात असलेलं राजकीय प्राबल्य गमावल्यानंतर पक्षावर दुरगामी परिणाम होण्याची शक्यता देखील अधिक आहे.


शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणाची दिशा बदलली


तसं म्हटलं तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय स्थित्यंतर देखील रंजक असं आहे. कारण, स्वातंत्र्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजवादाचा प्रभाव होता. जगन्नाथ भोसले, मधु दंडवते, बॅरिस्टर नाथ पै, शारदा मुखर्जी यांनी या लोकसभा मतदारसंघातून नेतृत्व केले. पण, शिवसेनेच्या स्थापनेनंतर नव्वदच्या दशकात मात्र राजकारणानं दिशा बदलली. 1991 मध्ये ब्रिगेडियर सुधीर सावंत काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आहे. पण, त्यानंतर 1996 मध्ये शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांनी विजय मिळवला. पण, प्रभू यांना 2009 साली निलेश राणे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पराभूत केले. 2008 मध्ये राजापूर लोकसभा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यानंतर 2014 पासून विनायक राऊत हे या ठिकाणाहून खासदार म्हणून निवडून आले आहेत. 1990 च्या दशकात सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीधर नाईक यांची हत्या झाली आणि कोकणातील रक्तरंचित आणि वर्चस्व वादाच्या राजकारणाला सुरूवात झाली. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर काही काळ शिवसेना मागे पडली. पण, 2014 नंतर मात्र कोकणात शिवसेनेनं पुन्हा एकदा आपलं प्राबल्य निर्माण केले. 


शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच


दरम्यान, या साऱ्यांमध्ये रत्नागिरीमध्ये सामंत हे राजकीय दृष्ट्या प्रबळ होत होते.अगदी ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर राणे आणि सामंत यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली. त्यात किरण सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी खासदारकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे अंतर्गत धुसफूस मात्र वाढली. त्याचा एकंदरीत सध्या देखील दिसून येत आहे. सध्या शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ही लढाई आगामी काळात आणखी तीव्र होईल असं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे आगामी काळातील कोकणातील वर्चस्ववादाचं राजकारण अधिक रंगतदार आणि रंजक होणार हे नक्की ! 


हे ही वाचा :


रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेचीच मात्र मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून माघार घेतली: उदय सामंत